
हिवाळी अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयता गँगची दहशत कशी वाढत चालली आहे याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांना मोक्का लावा, तडीपार अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिवाळी अधिवेशनात कोयता गँगचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्रात (Maharashtra) विशेषत: शहरी भागांमध्ये (City Area) कोयता गँगची (Koyta Gang) दहशत वाढू लागल्याची चिंता अजित पवारांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली. ‘कोयता गँग’च्या दहशतीतून महाराष्ट्राला मुक्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
ते म्हणाले, “राज्याच्या विविध भागांत अशा काही घटना घडल्या आहेत. एक कोयता गँग नावाची गँग उदयास झाली आहे. ते जातात आणि दहशत निर्माण करतात. काचा फोडतात, महिलांना दमदाटी करतात. हॉटेलमध्ये जाऊन खातात, बिलं देत नाहीत. मध्यमवर्गीयांच्या गाड्यांच्या काचा फोडतात. राज्याच्या शहरी भागात हे मोठ्या प्रमाणावर होतंय.”
कोयता गँगचे वाढते उपद्व्याप रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सभागृहात केली.
“हे कुठल्या पक्षाशी संबंधित नसतात. त्यामुळे यांना पक्ष वगैरे काही नाही. फक्त दहशत निर्माण करणं हा त्यांचा हेतू असतो आणि आहे. त्यामुळे यांचा बंदोबस्त केला गेलाच पाहिजे. कृपया याची नोंद सरकारने घ्यावी”, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.