
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होतंय. पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळण्यावर भर असणार आहे.
नागपूर : राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होतंय. पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळण्यावर भर असणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अधिवेशनात कसोटी असणार आहे. विशेष म्हणजे नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे संध्याकाळी नागपुरात दाखल होणार आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे.
दुसरीकडे विरोधकांनी अधिवेशनात आक्रमकपणे सरकारला घेरण्याचे संकेत दिलेत. महापुरूषांचा अपमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्याबाहेर गेलेले प्रकल्प, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, बेरोजगारी हे मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरणार आहेत.
नागपुरात सरकार दाखल होताच, नक्षलवादी सक्रीय झाले आहेत. नक्षलवाद्यांनी सरकारला इशारा दिलाय. सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार त्वरित रद्द करण्यात यावा अन्यथा… सरकार सुरजागड लोह खनिज खाणीचा विस्तार रद्द करणार नसेल तर आदिवासींचा हित पाहणाऱ्या सर्व घटकांनी एकत्रित सरकार विरोधात जनसंघर्ष उभारावा असं आवाहनही नक्षलवाद्यांनी एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून केला आहे… बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादीच्या पश्चिम सब जोनल ब्युरोने आज हे प्रेस रिलीज काढलंय. तसंच तेंदूपत्तालाही जीएसटीतून सूट देण्याची मागणी नक्षल्यांनी केली.