एक महिन्यात म्हाडाच्या १२ इमारतीत वायर चोरी

पुण्यात जाऊन मिळालेल्या माहितीनुसार एका घरात छापा टाकला. दोघेही चोरटे पोलिसांच्या हाती लागले. विशेष म्हणजे हे दोघेही इमारतीतील वायर चोरण्यात सराईत आहे. या दोघांवर राज्यभरात गुन्हे दाखल आहेत.

    डोंबिवली : डोंबिवलीतील खोणी परिसरात सुरु असलेल्या म्हाडाच्या इमारतीत तांब्याच्या वायर चोरणाऱ्या दोन सराईट चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चंदू शिंदे आणि भास्कर म्हाडीक अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाखांची चोरी केलेली वायर हस्तगत केली आहे.

    डोंबिवलीतील खोणी गाव परिसरात म्हाडाच्या इमारती बांधण्याचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या १२ इमारतीतून कॉपर वायर चाेरीस गेली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. एसीपी कल्याणजी घेणे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वनवे यांच्या तपास पथकाने तपास सुरु केला. पोलीस कर्मचारी राजेंद्र खिल्लारे, दीपक गडगे, शांताराम कसबे, महेंद्र मांजा, रविंद्र हासे, अशोक आहेर या पोलिसांनी सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. पोलीस पथकाने सीसीटीव्हीत गाडी शोधून काढली. ज्या गाडीतून चोरीस गेलेली वायर नेली होती. ही गाडी पुण्याची होती. पोलीस पथक पुण्यात पोहचले.

    पुण्यात जाऊन मिळालेल्या माहितीनुसार एका घरात छापा टाकला. दोघेही चोरटे पोलिसांच्या हाती लागले. विशेष म्हणजे हे दोघेही इमारतीतील वायर चोरण्यात सराईत आहे. या दोघांवर राज्यभरात गुन्हे दाखल आहेत. चोरट्यांची वेगवेगळी टोळी या दोघांचा वापर वायर चोरीसाठी करते. पोलिसांनी यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरीच्या प्रकरणात म्हाडाच्या कामातील कामगार कोणी सामिल आहे का? या अनुषंगाने देखील पोलीस तपास करीत आहेत. विशेष म्हणजे एक महिन्यापासून हे दोघे चोरी करीत होते. याची माहिती कोणाला मिळाली नाही ही बाब धक्कादायक होती.