रात्रीस खेळ चाले! चिखलगोठण फाट्यावर जादूटाेण्याचा प्रकार; भानामतीच्या प्रकाराने विद्यार्थी भीतीच्या छायेत

तासगाव तालुक्यातील चिखलगोठण फाट्यावर शनिवारी रात्रीच्या सुमारास चिखलगोठण, निंबळक,बोरगांव आणि बोरगाव हायस्कूल जाणारा रस्त्याच्या चौकात अज्ञात व्यक्तीकडून करणी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी निषेध केला. 

    तासगाव : तासगाव तालुक्यातील चिखलगोठण फाट्यावर शनिवारी रात्रीच्या सुमारास चिखलगोठण, निंबळक,बोरगांव आणि बोरगाव हायस्कूल जाणारा रस्त्याच्या चौकात अज्ञात व्यक्तीकडून करणी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी निषेध केला. चिखलगोठण फाट्यावरून पंचक्रोशी हायस्कूलला शिक्षणासाठी जाणाऱ्या निंबळक आणि नवे बोरगाव येथील मुलाची संख्या जास्त आहे. परंतु अंधश्रद्धाळू लोकांकडून वारंवार किमान मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमा यादिवशी हमखास भानामतीचा प्रकार केला जाताे. शाळेला जाणारे विद्यार्थी चौकातील करणीच्या प्रकाराने भीतीच्या छायेत प्रवास करत आहेत. वारंवार घडणाऱ्या करणी, भानामती प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी कारवाईी करावी, अशी मागणी होत आहे.

    दरम्यान, गावालगत असणाऱ्या चौक आणि तीन रस्त्याचा वापर भोंदुबाबा आणि अंधश्रद्धाळू मंत्रिकांना बरोबर घेऊन येऊन भानामती करत असल्याचे बोलले जात आहे. प्रवासी आणि नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. समाजात अंधश्रद्धेची जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी निंबळक, चिखलगोठण, बोरगाव गावातील पंचक्रोशी हायस्कूलचे विद्यार्थी आणि पालक यांनी असणाऱ्या सर्व भानामती साहित्यजाळून टाकत निषेध केला.

    अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नये
    वास्तविक पाहता माणसाने आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. सुप, दुरडी, लिंबू, नारळ, लवंग,मिरे आणि काळ पांढर लावून, अंडी दामटा, केळी, पपई यांना टाचण्या मारून काहीही होत नाही. मुळातच हा घडत असलेला प्रकार निंदनीय आहे. अंधश्रद्धेवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन माजी सरपंच शंकर सोमदे यांनी केले आहे. यावेळी किरण निकम, किरण पाटील, माजी सरपंच अधिकाराव साळुंखे, सुंदरनाथ पाटील अनिल पाटील, अक्षय पवार, महादेव पवार,शिक्षक पांडुरंग महाडिक यांनी केले आहे.