
शेतकरी, कामगारांचे भविष्य उज्वल
सातारा : “स्व. लालसिंगराव शिंदे, स्व. राजेंद्र यांनी प्रतापगड कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला. आज हे दोघेही आपल्यात नाहीत पण, कारखाना इथेच आहे. हा कारखाना जावलीतील सभासद शेतकऱ्यांचा आहे तो पुन्हा सुरु झाला पाहिजे. आज आपण सुरुवात करत आहोत. अनेक अडचणी असल्या तरी, हा गाळप हंगाम यशस्वी करणार असून सर्वांच्या सहकार्याने प्रतापगड कारखाना पुन्हा उभारी घेईल”, असा विश्वास आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. दरम्यान, जावली तालुक्यातील सर्व ऊस प्रतापगडला घालून शेतकरी आणि कामगारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.
अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यमातून जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्यात आला असून कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत मोळी टाकून मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, सुनेत्रा शिंदे, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, राजेंद्र भिलारे, माजी सभापती अरुणा शिर्के, मोहन शिंदे, जयदीप शिंदे, अंकिता शिंदे, बुवासाहेब पिसाळ, रवी परामणे, सुधाकर भोसले आदी मान्यवरांसह दोन्ही कारखान्याचे सांचालक उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “सभासद शेतकऱ्यांच्या पैश्यातून हा कारखाना उभा राहिला आहे. कारखान्याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. कारखान्याचे मालक सभासद- शेतकरीच आहेत आम्ही फक्त केअर टेकर म्हणून काम करत आहोत. हा कारखाना पुन्हा उभा राहिला पाहिजे, येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे याचा प्रयत्न आम्ही सुरु केला असून हा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपला ऊस या कारखान्याला पुरवावा हीच विनंती आहे. स्व. लालसिंगराव शिंदे, स्व. राजेंद्र यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वानीच आपले योगदान दिले पाहिजे. आ. शशिकांत शिंदे, सदाभाऊ सपकाळ, दीपक पवार आदी नेते मंडळी नेहमी म्हणत आले आहेत की हा कारखाना सुरु झाला पाहिजे. आता हा कारखाना सुरु झाला आहे. कारखान्याचे कामकाज राजकारण विरहित असून गटतट न पाहता सर्वांचाच ऊस घेतला जाणार आहे.”
आजची दुष्काळाची परिस्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. आपण शून्यातून सुरुवात करत आहोत. येथील शेतकऱ्यांनी आपला ऊस घालवण्यासाठी किती दिवस दुसऱ्याच्या दारात जायचे? आपली हक्काची संस्था उभी राहिली सक्षम झाली तर आपल्याला कोणाच्या दारात जावेच लागणार नाही. त्यामुळे आता तुम्ही ऊस पुरवून सहकार्य करा, तुमच्या हक्काची हि संस्था निश्चितच उभारी घेईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. ऊस दराच्या बद्दल कोणीही चिंता करू नये. इतर कारखान्यांपेक्षा आपणही दर देण्यासाठी कमी पडणार नाही याची खात्री मी देतो. अत्यंत काटकसरीने आपण कारखाना चालवणार असून फक्त तुमचे सहकार्य कायम ठेवा, सर्वांच्या साथीने हा कारखाना सक्षम करूया, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
मानकुमरे म्हणाले, हा कारखाना चालू होत आहे हे आपल्या तालुक्याचे भाग्य आहे. आत हा कारखाना सक्षमपणे चालवा यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौरभ बाबा यांना सर्वांनी सहकार्य करावे.
सौरभ शिंदे म्हणाले, आजचा दिवस म्हणजे सुवर्णक्षण आहे. अजिंक्यतारा कारखान्याच्या साथीने प्रतापगड कारखाना उभा रहात आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती झाली असून तालुक्याचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कारखान्याला सर्वांनी सहकार्य करावे.
व्हा. चेअरमन मर्ढेकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव सावंत यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद- शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.