‘ईडी आणि सीबीआयच्या मदतीने भाजपने केलं पक्ष फोडण्याचे काम’; शरद पवारांची टीका

ईडी आणि सीबीआयच्या मदतीने महाराष्ट्रातील पक्ष फोडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. ते म्हणाले, आमच्या सहकाऱ्यांविरुद्ध अशी काही पावले उचलण्यात आली.

    मुंबई : ईडी आणि सीबीआयच्या मदतीने महाराष्ट्रातील पक्ष फोडण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. ते म्हणाले, आमच्या सहकाऱ्यांविरुद्ध अशी काही पावले उचलण्यात आली. त्यामुळे त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. महाराष्ट्रात भाजप जिंकू शकत नाही, हे त्यांना ठावूक आहे. त्यामुळे त्यांनी तपास यंत्रणांचा गैरवापर केला.

    तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे पक्ष फोडून आलो आहे, असे उघडपणे सांगत आहेत. लोकांनाही ही गोष्ट आवडलेली नाही. बारामतीच्या जागेवर आपली आणि अजित पवार यांच्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे पुतणे अजित पवार यांचे नाव न घेता ते म्हणाले की, खरी राष्ट्रवादी कोणी निर्माण केली हे जनतेला माहीत आहे. आज कोणीही म्हणू शकतो की मी पक्ष निर्माण केला. पण त्यांना मंत्री कोणी केले हे जनतेला माहीत आहे. अशा दाव्यांवर लोक हसत आहेत, असेही पवार यांनी म्हटले.

    दरम्यान, आम्ही भाजपच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकलो होतो, पण आता आमचे काही लोक भाजपासोबत उभे आहेत. पंतप्रधान मोदी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 50 टक्के जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.