गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह करून आंदोलन करावं लागेल; बाबा आढाव यांचा इशारा

    पुणे : पुण्यातील रिक्षा चालकांना चक्का जाम आंदोलन चांगलच भोवलं होतं. आंदोलनात सहभागी असलेल्या 37 रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ऑटो रिक्षा बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीने निदर्शनं केली आहेत. कष्ट करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. हे गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह करून आंदोलन करावं लागेल, असा इशारा देखील बाबा आढाव यांनी दिला आहे.

    बाबा आढाव यांनी आणि रिक्षा पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत आंदोलन केलं, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिलं. रिक्षाचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे बेकायदेशीर आहेत. हातावर पोट असणाऱ्या सगळ्या रिक्षाचालकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी बाबा आढाव यांनी केली आहे.