24 तासाच्या आतच महायुतीमध्ये सातार्‍यात पडली ठिणगी ; शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी घेतली आक्रमक भूमिका

मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथील गांधी मैदानावर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला 24 तास होत नाही तोच महायुतीमध्ये ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचीच आता जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झालेली आहे.

    सातारा : मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथील गांधी मैदानावर मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला महायुती पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला 24 तास होत नाही तोच महायुतीमध्ये ठिणगी पडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचीच आता जोरदार चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झालेली आहे.

    याबाबत बोलताना चंद्रकांत जाधव म्हणाले, आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी व हिंदुत्वासाठी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भूमिका मांडली. ग्रामीण भागातून आलेल्या कष्टकरी, कामगार व त्यांच्या मुलांचे चांगल्या पद्धतीने वैचारिक संगोपन केले. त्यामुळे खर्‍या अर्थाने महाराष्ट्रावरती शिवसेनेचा भगवा फडकला. यामध्ये कुणीही प्रस्थापित घराण्यातली व्यक्ती नव्हती. त्यामुळेच आज शिवसेनेची सत्ता आहे.

    सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देश व महाराष्ट्रात विकासाची घोडदौड सुरू झालेली आहे. महिला वर्गाला एसटीमध्ये अर्धे तिकीट, जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, वेळेत कर्ज पुरवठा व कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांसाठी अनुदान, तसेच सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा खासदार निवडून येण्यामध्ये कोणती अडचण नाही.

    अशा वेळेला सातारा जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्ता किंवा शिवसैनिकांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार बनवले पाहिजे. कारण ही किमया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे सातारा जिल्ह्यातील माननीय शिवसेनेचे खासदार हिंदुराव निंबाळकर व आमदार सदाशिव सकपाळ व शंभूराज देसाई निवडून आले होते आणि यापुढेही शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार निवडून येणार आहेत. हिंदूहृदयसम्राटांचा हाच कित्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरवावा. जेणेकरुन सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही सत्ता भोगण्याची संधी मिळेल. त्यामुळे सध्या लोकसभा निवडणुकीला अवधी असला तरी प्रत्येक इच्छुक उमेदवार हा लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहे पण मतदारांचाही कौल महत्त्वाचा आहे. ज्या सातारा जिल्ह्यातील मतदारांनी कौल दिलेला आहे त्याचं राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळेला त्यांनी संपूर्ण मतदारसंघातील आकडेवारी व मिळालेले मतदान याची वस्तुनिष्ठ माहिती पत्रकारांना दिली.