हातकणंगलेत अनैतिक संबंधातून महिलेचा खून; दोरीने गळा आवळून संपवूनच टाकलं

हातकणंगले औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर चौगुले-खोत गल्ली येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबंधातून दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. रूपाली दादासो गावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी उघडकीस आला.

    हातकणंगले : हातकणंगले औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या मार्गावर चौगुले-खोत गल्ली येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा अनैतिक संबंधातून दोरीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. रूपाली दादासो गावडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.26) सकाळी उघडकीस आला. या घटनेबाबत नागेश गुड्डापा काळे (रा. आगाशी नगर, मलकापुर. सध्या रा. माळवाडी, हिंगणगांव) याने हातकणंगले पोलिसांत फिर्याद दिली.

    हातकणंगले पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, हातकणंगले येथील राजदीप खोत यांच्या मालकीच्या घरी मयत रूपाली दादासो गावडे (वय २८, सध्या रा. हातकणंगले, मूळ गाव बागणी ता. वाळवा) सहा वर्षांपासून माहेरी हिंगणगांव (ता.हातकणंगले) येथे राहत होती. चार दिवसांपूर्वी हातकणंगले येथील खोत-चौगुले गल्ली येथील राजदीप खोत यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाडेकरू म्हणून राहण्यास आली होती. रूपाली गावडे ही गेल्या सहा वर्षांपासून विभक्त राहत होती.

    दरम्यान, संशयित आरोपी प्रकाश शेखर हदिमनी (वय ३५, रा. हिंगणगांव, ता. हातकणंगले) यांच्यात अनैतिक संबंध होते. मात्र, संशयित आरोपी प्रकाश हदिमनी हा नेहमी तिच्यावर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करायचा. सोमवारी रात्री आरोपी प्रकाश हदिमनी व रूपाली गावडे यांच्यामध्ये चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. आरोपी प्रकाश याने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.