crime

महाडमध्ये एका महिलेने पोटच्या सहा मुलांची विहिरीत ढकलून हत्या (Murder) केली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.

    महाड :  आई आणि मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. महाडमध्ये एका महिलेने पोटच्या सहा मुलांची विहिरीत ढकलून हत्या (Murder) केली आहे. या महिलेच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे या महिलेचे म्हणणे आहे.

    या घटनेचा तपास तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या कमिटीमार्फत सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेतील लहानग्या मुलांच्या मृतदेहांवर असनपोई गाव हद्दीत सामूहिक अंत्यसंस्कार (Mass Funeral) करण्यात येणार आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि पाच मुलींचा समावेश आहे. रुना सहानी असे आरोपी मातेचे नाव आहे.

    मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले सहानी कुटुंब कामधंद्याच्या निमित्ताने महाडमधील ढालकाठी येथे आले. आरोपी रुना सहानी आणि तिचा पती चिखुरी सहानी यांच्यामध्ये नेहमी भांडण व्हायची. चिखुरी दररोज घरी दारुच्या नशेत यायचा आणि पत्नीला त्रास द्यायचा. याच त्रासाला कंटाळून महिलेने आधी आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेतली. मात्र महिलेला उडी घेत असताना आदिवासी पाड्यातील लोकांनी पाहिले. त्यांनी महिलेला वाचवले आणि पाड्यावर आणले. त्यानंतर त्यांनी महिलेकडे प्रकाराबाबत विचारपूस केली असता महिलेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर सहा मुलांना विहिरीत फेकल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस, बचाव पथक आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सहाही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. महिलेच्या अटकेनंतर तीन पोलिसांची कमिटी याविषयी सखोल तपास करत आहे.