अंडी चोरल्याच्या संशयातून महिलेचा विनयभंग; अंगावरील कपडे काढण्यास सांगितले अन्…

पुण्यतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिलेला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडलं. इतकचं नाही, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला.

    पुणे : पुण्यतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेलमधील अंडी चोरल्याच्या संशयातून एका ५० वर्षीय महिलेला जबरदस्तीने कपडे उतरवण्यास भाग पाडलं. इतकचं नाही, तर तिचा विनयभंग देखील करण्यात आला.

    हा संतापजनक प्रकार पुण्यातील येरवडा परिसरात रविवारी (१७ डिसेंबर) दुपारच्या सुमारास घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुकेश सिंह पुंन्डील असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पुण्यातील येरवडा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. आरोपी मुकेश देखील याच हॉटेलमध्ये कुक म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास पीडित महिला हॉटेलमधील किचनमध्ये काम करीत असताना आरोपी मुकेश हा तिथे आला. तू अंडी कुठे लपवून ठेवले असं म्हणत त्याने पीडितेवर अंडी चोरल्याचा आरोप लावला. इतकंच नाही, तर आरोपीने महिलेच्या अंगाची झडती घेत तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले.

    आरोपीचं कृत्य इथेच थांबलं नाही, तर या प्रकारानंतर जेव्हा महिला घरी निघाली, तेव्हा त्याने तिचा रस्ता अडवला. त्याचबरोबर विनयभंग करीत शेरेबाजी देखील केली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडित महिलेने येरवडा पोलिसांत धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

    दरम्यान, पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेश सिंह पुंन्डील याच्यावर विनभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात असून घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.