पुण्यातील बुधवार पेठेत फिरस्त्या महिलेचा खून; मोबाईल चोरीच्या संशयातून खून झाल्याची माहिती, पुणे पोलिसांकडून दोघांना अटक; घटनेने खळबळ

  पुणे : पुण्याच्या बुधवार पेठेत एका फिरस्त्या महिलेचा दोन तरुणांनी मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिला मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन बेदम मारहाण केली. तिच्या डोक्यात लाकडी बांबू मारल्याने या घटनेत ती गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा

  वर्षा थोरात (वय ३४, रा. फिरस्ती) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अब्दुल सय्यद आणि गौरव चौगुले यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षा या फिरस्त्या होत्या. त्यांना दारुचे व्यसन होते.

  वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण

  दरम्यान, अब्दुल सय्यद याचा अंडा-भुर्जीचा गाडा आहे. दरम्यान, त्याचा पंधरा दिवसांपूर्वी मोबाईल चोरीला गेला होता़. हा मोबाईल वर्षा हिने चोरल्याचा संशय त्याला होता. संशयावरून अब्दुल आणि गौरव यांनी वर्षा हिला मोबाईलबाबत विचारणा केली. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा त्यांनी वर्षा हिच्या डोक्यात काठीने मारहाण केली. काठीचा घाव डोक्यात बसल्याने वर्षा जागीच खाली कोसळली. ती बेशुद्ध पडली.

  रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू

  वर्षा हिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांनी  घटनेची माहिती मिळताच धाव घेतली. तसेच, अब्दुल व गौरव यांना ताब्यात घेतले. दरम्यान, याघटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहे. त्यात मारहाणीचा प्रकार कैद झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.