खून करून महिलेचा झाडाला लटकवला मृतदेह; ‘लिव्ह इन पार्टनर’ने केला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न, पण पोस्टमार्टम रिपोर्ट आला अन्…

जरीपटका ठाण्यांतर्गत 23 दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी 'लिव्ह इन पार्टनर'ने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता.

    नागपूर : जरीपटका ठाण्यांतर्गत 23 दिवसांपूर्वी एक महिला झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली होती. महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्या भासवण्यासाठी ‘लिव्ह इन पार्टनर’ने तिचा मृतदेह झाडाला लटकवला होता. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात त्याचे पितळ उघडे पडले. गळा आवळून हत्या आणि मृत्यूपूर्वी झटापट झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

    पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. बाजीरावचा धाक दाखवताच प्रियकराने खुनाची कबुली दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. गंगाधर अर्जुन घरडे (वय 48, रा. नागार्जुन कॉलनी, जरीपटका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गंगाधर पेंटिंगचे काम करतो. 1 मार्चच्या रात्री गंगाधरने त्याची प्रेयसी नीतू (34) हिची गळा आवळून हत्या केली. रात्रीतून तिचा मृतदेह घराच्या अंगणातील सीताफळाच्या झाडाला दोरी बांधून लटकवला.

    2 मार्चच्या सकाळी त्याने नीतूने आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. नीतूच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. नीतूच्या शरीरावर काही जखमा होत्या. चौकशीत नीतूच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पहिल्या पतीपासून तिला दोन मुली होत्या. मात्र, भांडणामुळे 2017 मध्ये ती पतीपासून वेगळी झाली. ती स्वतः काम करून उदरनिर्वाह चालवत होती. 2019 मध्ये तिने गंगाधरशी लग्न करत असल्याचे कटुंबीयांना सांगितले. त्यानंतर ती गंगाधरसोबत राहू लागली. काही दिवसानंतर नीतूने कुटुंबीयांना गंगाधर आधीपासूनच विवाहित असून त्याला दोन मुलीही आहेत.