mantralaya

शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर पी 16 आहे. हा प्लॉट 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करुन शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे असलेला हा प्लॉट नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस खोटी नोटरी बनवून नावावर केला.

मुंबई: मंत्रालयासमोर (Mantralaya) विष (Poison) प्राशन करणाऱ्या धुळ्यातील (Dhule) महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल गादेकर असं या महिलेचं नाव आहे.  तिने काल (27 मार्च) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्लॉटचा वाद
शीतल गादेकर या महिलेच्या पतीच्या नावे धुळे एमआयडीसी परिसरात प्लॉट नंबर पी 16 आहे. हा प्लॉट 2010 मध्ये तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संगनमत करुन शीतल गादेकर यांच्या पतीच्या नावे असलेला हा प्लॉट नरेश कुमार मानकचंद मुनोत या व्यक्तीच्या नावे बोगस खोटी नोटरी बनवून नावावर केला. तत्कालीन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी खरेदी खत ऐवजी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बोगस सह्या करुन, शीतल गादेकर यांचे पती रवींद्र गादेकर यांच्या छायाचित्रांचा गैरवापर करत बोगस इसम उभा केला. त्याच्या माध्यमातून हा प्लॉट हस्तांतरित करण्यात आला, अशी तक्रार शीतल गादेकर यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. त्यांनी याबाबत माजी मुख्यमंत्री, माजी उद्योग मंत्री, माजी मुख्य सचिव, तसेच प्रधान सचिव, मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालय, रजिस्टर जनरल अधिकारी मुंबई उच्च न्यायालय, तसेच पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र, पोलीस अधीक्षक धुळे, तसेच प्रादेशिक एमआयडीसी अधिकारी, विभागीय एमआयडीसी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा मुख्य न्यायाधीश, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.

या जागेच्या संदर्भात न्याय मिळावा या मागणीसाठी शीतल गाडेकर यांनी 2020 पासून सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता. तसंच 27 मार्च रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी गेल्या महिन्यात दिला होता. मात्र तरी देखील न्याय मिळत नसल्याने नैराश्यातून त्यांनी मंत्रालयासमोर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु या घटनेत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.