अप्पर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात महिलेचा राडा; महिला पोलीस हवालदारांच्या डोक्यात घातला मोबाईल

पुर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात महिलेने राडा घातल्याची घटना घडली. महिलेने एक तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाचा अहवाल मनासारखा नसल्यावरून तिने गोंधळ घालत महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात मोबाईल मारला.

    पुणे : पुर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात महिलेने राडा घातल्याची घटना घडली. महिलेने एक तक्रार अर्ज दिला होता. त्या तक्रार अर्जाचा अहवाल मनासारखा नसल्यावरून तिने गोंधळ घालत महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात मोबाईल मारला. यावेळी महिलेला ताब्यात घेऊन बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेल्यानंतर देखील तिने तिथेही पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घातल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

    याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार राखी खवले यांनी तक्रार दिली आहे. यानूसार, येरवडा गावठाण येथील एका महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस हवालदार खवले या पुर्व विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयात नेमणूकीस आहेत. यातील महिलेने तक्रार अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने खडकी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाने एक अहवाल अप्पर आयुक्त कार्यालयात पाठविला होता. तो अहवाल आल्यानंतर महिलेला बोलविले होते. तर हा अहवाल त्यांना खवले या सांगत होत्या.

    मात्र, संबंधित महिलेने तो अहवाल मनासारखा नसल्याने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. तसेच, आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले असता बाहेर न जाता हातातील मोबाईल तक्रारदार यांच्या डोक्यात मारला. त्यांना धक्काबुक्की करत पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेला बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेण्यात आले असता तेथेही पोलीस अंमलदार यांच्यासोबत देखील झटापट केली असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

    दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून महिलेला अटक केली. पुढील तपास महिला उपनिरीक्षक तांगडे या करत आहेत.