चांगला निर्णय! महिलाही विनयभंगाच्या कलमांतर्गत दोषी, महानगरदंडाधिकाऱ्यांकडून दुर्मिळात दुर्मिळ शिक्षा; शेजारील महिलेच्या भांडणात कपडे फाडल्याप्रकरणी वर्षाचा कारावास

प्रत्यक्षदर्शीनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपला गळा पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि आपले कपडे फाडले, असे तक्रारदार महिलेने पोलिसांचा माहिती देताना सांगितले. तसेच आरोपी महिलेने आपल्याला मारहाण करून विनयाचा भंग केला तसेच कपडे फाडून वैयक्तिक जगण्याच्या अधिकाराचाही भंग केला.

    मुंबई : शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत (Neighbour Women) झालेल्या भांडणात (Quarrel) तक्रारदार महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याप्रकरणी (Tearing Clothes) ३८ वर्षीय आरोपी महिलेला महानगरदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले. विनयभंगासाठी एखादी महिलाही दोषी ठरू शकते, असे स्पष्ट करत तिला एक वर्षाच्या  कारावासाची शिक्षा (Years Imprisonment) सुनावत ६ हजारांचा दंडही (Fine) ठोठावला.

    आरोपी आणि तक्रारदार महिलांच्या दोन्ही कुटुंबियांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद आणि भांडणं होती, त्यातच दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणादरम्यान आरोपीने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली. त्यानंतर दुसऱ्या चप्पलने तिच्या डोक्यावर मारले. प्रत्यक्षदर्शीनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने आपला गळा पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि आपले कपडे फाडले, असे तक्रारदार महिलेने पोलिसांचा माहिती देताना सांगितले. तसेच आरोपी महिलेने आपल्याला मारहाण करून विनयाचा भंग केला तसेच कपडे फाडून वैयक्तिक जगण्याच्या अधिकाराचाही भंग केला. त्यावरच न थांबता भांडण करताना पतीला आपल्यावर बलात्कार करण्यासही सांगितले. यावेळी इमारतीतील सर्व पुरुष तेथे उपस्थित होते. असेही तक्रारदार महिलेने सांगितले. त्यावर नुकतीच दंडाधिकाऱ्य़ासमोर सुनावणी पार पडली.

    न्यायालयाचे निरीक्षण

    तक्रारदार महिलेचा विनयाचा भंग होईल, अशी वागणूक आरोपीने दिली असून आणि तिचे कपडे फाडल्याचे सगळ्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीपुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही एखाद्या महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने बळाचा वापर करून किंवा तिला मारहाण करण्यात येत असेल तर महिलेलाही विनयभंगाच्या आरोपातर्गत दोषी ठरवता येऊ शकते. एखाद्या स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावे, असे कायद्यात नमूद करण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने आरोपीला विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवताना आदेशात स्पष्ट केले आणि आरोपी तीन मुलांची आई असल्यामुळे तिला कमाल पाच वर्षांच्या शिक्षेऐवजी किमान एक वर्षाची शिक्षा ठोठावत सहा हजार रुपयांचा दंडही सुनावला.