स्वतःच्या शेतातील गहू साफ करत होती महिला, अचानक मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकला, दुर्दैवी मृत्यू!

गहू स्वच्छ करत असताना शांताबाईंच्या गळ्याला गुंडाळलेला रुमाल अचानक मशीनमध्ये अडकला. यावेळी गळ्याला फास बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

बुलडाणा : अनेक वेळा शेतकरी, कामगार शेतात कारण्यात काम करताना कित्येतदा अपघाताला (Accident]) बळी पडतात. बऱ्याचदा अनावधाने यंत्रावर काम करताना असे अपघात होतात. बुलडाण्यातही एक अशीच घटना उघडकीस आली आहे. शेतात काम करताना एका महिलेल्या गळ्यातील रुमाल गहू साफ करण्याच्या फिल्टर मशीनमध्ये अडकल्याने शेतकरी महिलेला प्राण गमवावे लागले आहे. शांताबाई शेवाळे (वय, ३५) असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या शेतातील नवीन गहू बाजारात विक्रीला पाठवण्याकरिता शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू आहे. त्यासाठी शेतात गहू साफ करण्याच्या कामात शेतकरी वर्ग गुंतला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे हे स्वत:, त्यांच्या पत्नी शांताबाई आणि मुलासह स्वतःच्या शेतामध्ये गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. गहू स्वच्छ करीत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला गुंडाळलेला रुमाल अचानक मशीनमध्ये अडकला. यावेळी फिल्टर मशीनमध्ये अडकलेल्या रुमालाचा गळ्याला फास बसल्याने शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे. शांताबाई शेवाळे यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गाव धक्क्यात आहे.