शेतीकामासाठी जाणाऱ्या महिलांना अज्ञात वाहनाची जोरदार धडक; एक महिला गंभीर तर तिघी…

मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील शेतीसाठी सिरसो-दर्यापूर मार्गाने जाणाऱ्या चार महिलांना अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या अपघातात तीन महिला किरकोळ, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

    अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील शेतीसाठी सिरसो-दर्यापूर मार्गाने जाणाऱ्या चार महिलांना अज्ञात वाहनाने मागून जबर धडक दिली. या अपघातात तीन महिला किरकोळ, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, मीना खंडारे (वय 38, रा. सिरसो) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अनुसया खंडारे, अनिता गवई, ज्योती खंडारे व फिर्यादी या चौघी शेतमजुरीसाठी सकाळी सिरसो-दर्यापूर मार्गाने जात होत्या. सिरसोजवळ मार्गावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात अनुसया खंडारे यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना स्थनिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.

    तसेच तिघी किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्यावर अज्ञात वाहनचालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.