पिंपरीच्या महिला झाल्या शेतीच्या मालकीण ; सातबारा उताऱ्यावर पतीसह पत्नीच्या नावाची नोंद

मासूम संस्था गेली दोन वर्ष पुरंदर तालुक्यात शेत दोघांचे अभियान राबवत आहे. यामध्ये पिपंरी गावातून अनेक महिला आणि पुरुष जोडप्यांनी सहभाग घेतला आहे. त्यातून  प्रत्यक्ष ७/१२ वर नाव लागलेल्या जोडप्यांना  मोफत सातबारा वाटप  करण्यात आले.

    माळशिरस : मासूम संस्था गेली दोन वर्ष पुरंदर तालुक्यात शेत दोघांचे अभियान राबवत आहे. यामध्ये पिपंरी गावातून अनेक महिला आणि पुरुष जोडप्यांनी सहभाग घेतला आहे. त्यातून  प्रत्यक्ष ७/१२ वर नाव लागलेल्या जोडप्यांना  मोफत सातबारा वाटप  करण्यात आले.

    आता फक्त सातबारावर नाव आले, यावरच थांबायचं नाही तर यापुढे महिलांना शेतकरी म्हणून मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी फॉर्म भरले जावेत आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या त्यांनी सभासद होऊन शेतीसाठी पिक कर्ज घेऊन शुन्य टक्के व्याजाने कर्ज मिळणाऱ्या योजनेचा लाभ घ्यावा तसेच, शेतकरी कार्यशाळेमध्ये महिलांनी सहभागी व्हावे आणि शेतीबाबतचे सर्व निर्णय घ्यावेत, असे आवाहन  मासूमच्या कार्यकर्त्या मिना  शेंडकर यांनी   केले.

    पिंपरी ( ता. पुरंदर) येथे लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सातबारावर पतीच्या नावाबरोबर पत्नीचे नाव लागलेल्या जोडप्यांचा सन्मान व मोफत सातबारा वितरण कार्यक्रम भैरवनाथ मंदिरात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या.  अध्यक्षस्थानी उषा चव्हाण होत्या. पिंपरी विकास सोसायटीचे चेअरमन विजय थेऊरकर,  वैशाली  कुंभारकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांची नावे सातबारा उताऱ्यावर समाविष्ट करण्यासाठी महसूल प्रशासनाचे सहकार्य मिळाले या बद्दल गावच्या तलाठ्याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

    महसूल प्रशासनातील जिल्हाधिकारी, तहसीलदार पुरंदर, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून महिलांची नावे सातबारावर लावण्यासाठी मासूमने चांगले काम केले आहे.

    महादेव शेंडकर, कृषिभूषण.

    दरम्यान, गावातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेत सहभागी होऊन  आपले नाव सातबारामध्ये लावावे, असे आवाहन पिंपरी विकास सोसायटीचे चेअरमन विजय थेऊरकर यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली सुतार यांनी केले. स्वागत वर्षा थेऊरकर व प्रास्ताविक शितल चव्हाण आणि आभार शितल तांबे यांनी मानले. संयोजन मासूमच्या कार्यकर्त्या मोनाली म्हेत्रे व गावातील महिलांनी  केले.