धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांचे तीव्र आंदोलन

भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघडीच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून, महाडिक यांच्या विरोधात काळ्या साड्या परिधान करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

    कोल्हापूर : भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून, महाडिक यांच्या विरोधात काळ्या साड्या परिधान करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

    कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याच प्रचारादरम्यान भाजपचे नेते माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघडीच्या महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून, महाडिक यांच्या विरोधात काळ्या साड्या परिधान करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

    शिवाय त्यांनी सर्व महिलांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. येथील करवीर संस्थापिका महाराणी ताराराणींच्या पुतळ्यासमोर महिलांनी हे आंदोलन केले.

    काय म्हणाले धनंजय महाडिक?

    काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने पाठिंबा देत महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. भाजपाकडून सत्यजित उर्फ नाना कदम हे रिंगणात आहेत.

    त्यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरातील एका प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसचे लोक येथे येईल आणि आम्ही महिला उमेदवार दिली आहे, असे सांगतील. तुम्ही सगळ्या महिला आहात. ती बिचारी आहे. तिला मतदान करा. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा एखादा पती गेला आणि तो आधी प्लंबिंग काम करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? जर तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का? ज्याचे काम त्यानेच करायचे असते. त्यांचे पती आमदार होते म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणले असेही धनंजय महाडिक म्हणाले.

    त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ताराराणींच्या कोल्हापूरात असून सुद्धा असे विचार कसे? नारीशक्तीचा आपण अपमान केला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर आपण शंका उपस्थित केली आहे. अशा बुरसटलेल्या विचारामुळेच आपल्याला कोल्हापूरकरांनी नाकारले आहे अशा अनेक टीका सुरू आहेत.