woman st bus driver

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी देत (MSRTC ) त्यांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. महिला देखील उत्तम चालक होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी महिलांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं.

    मुंबई : एसटी बस जिला लालपरी असं संबोधलं जात ती महाराष्ट्रातल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटी बसमध्ये आजवर अनेक बदल झाले. असाच आणखी एक बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा महिला चालक एसटी बस (Maharashtra State Road Transport Corporation) चालवताना आपल्याला दिसणार आहेत.

    महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांना चालक होण्याची संधी देत (MSRTC ) त्यांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. महिला देखील उत्तम चालक होऊ शकतात यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी महिलांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं.
    महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. मात्र आता एसटीचं स्टेअरिंग आता ‘ती’ च्या हाती असणार आहे. राज्यात पहिल्यांदाच महिला एसटी बस (ST) चालवणार आहेत.

    महिला कुठल्याच क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध करणारा ST महामंडळाचा हा निर्णय सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे तर सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण झाल्यावर महिला एसटी चालक आपल्याला एसटी चालवताना दिसणार आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये पहिल्यांदा महिला चालक अशा पदाची जाहिरात दिली गेली. कोरोनाकाळात या महिलांचं प्रशिक्षण थांबलं पण नंतर परत सुरु झालं. वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेल्या या महिला आज आपण चालक होतोय. यामुळे अतिशय आनंदात होत्या. आम्ही देखील महाराष्ट्राची सेवा करू शकतो, चालक म्हणून काम करू शकतो. ही अभिमानाची भावना असल्याचं त्या सांगतात.

    काळानुसार अनेक बदल होत असतात. आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक वाहने चालवण्याचं काम महिला करतात. आता एसटीही चालवताना आपल्याला महिला दिसणार असल्याने या नव्या बदलाचे स्वागत करायला हवे, अशी अनेक महिलांची भावना आहे.