Women's Radha in Akola Central Cooperative Bank! Complaints of fraud have been simmering for two years, prompting officials to take action

अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संपूर्ण कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फसवणूक झालेल्या खातेदारांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ३१ मे रोजी जामखेड येथील महिला ग्राहकांनी आपल्या लहान मुलाबाळांसह शाखेसमोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

    जऊळका : येथील अकोला मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक किसन सुभाष खुळे याने तब्बल लाखो रुपयांची अफरातफर केल्याचे खातेदाराच्या निदर्शनास आले. त्यावरून, याबाबत ३१ मे रेाजी जामखेड येथील काही महिला ग्राहकांनी दोन वर्षापासून पैसे न मिळाल्यामुळे शाखा व्यवस्थापक व कॅशियर यांना चांगलेच धारेवर धरून राडा घातला. तब्बल दोन तासाच्या राड्यानंतर महिला ग्राहकांना तात्पुरते तोंडी आश्वासन दिल्यानंतरच शाखा अधिकारी यांनी शाखा उघडल्याने दैनंदिन ग्राहकांना दोन तास ताटकळत बसावे लागले.

    मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत झालेल्या घोटाळ्यामुळे खातेदारांची हेळसांड होत आहे. त्यामुळे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संपूर्ण कार्यभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. फसवणूक झालेल्या खातेदारांनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ३१ मे रोजी जामखेड येथील महिला ग्राहकांनी आपल्या लहान मुलाबाळांसह शाखेसमोर ठिय्या मांडून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

    यात लक्ष्मीबाई रामकिसन माघाडे यांची ८ हजार ७८६ रुपये, रंजना विष्णू लठाड १३ हजार रुपये, संगीता ज्ञानेश्वर गिर्हे यांची १५ हजार रुपये, मीना राजू झ्याटे ३५ हजार रुपये, शांता संदीप पोफळे २० हजार रुपये, सिमा मनोहर झ्याटे यांची २० हजार रुपये आणि मंगला वसंत पोफळे यांची ६० हजार रुपये आदी प्रमाणे आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेवून न्याय द्यावा. तसेच, दोषींवर कारवाई करावी, यासाठी या महिलांनी बॅंकेत ठिय्या देऊन राडा केला.