
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने २०२४ मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन लोकसभा प्रवास योजना महाराष्ट्र प्रमुख व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत कोल्हापूर, हातकणंगले विभागाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यात लोकसभा कोअर टीम व विधानसभा प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बाेलत हाेते.
लोकसभेसाठी सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचवा
आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नवमतदार नोंदणी, वॉर रूम, निवडणूक विश्लेषण, आगामी काळात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांचे पक्ष प्रवेश यांच्यासह मोदी @9 कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये झालेले घर घर संपर्क अभियान, व्यापारी संमेलन, प्रभावी व्यक्तींच्या भेटी, घर घर तिरंगा, मन की बात, मेरी माटी, मेरा देश, विभाजन विभीषिका, तिरंगा रेली, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव बैठकीत घेण्यात आला.
संघटनात्मक कामांची माहिती दिली
यावेळी लोकसभा प्रभारी भरत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, विजय जाधव, राहूल देसाई, महेश जाधव, शौमिका महाडिक, राहूल चिकोडे, नाथाजी पाटील, सत्यजित कदम, सोनाली मगदुम, पृथ्वीराज यादव, अशोकराव माने, संजय पाटील, संग्रामसिंह कुपेकर, विजय भोजे, संदीप देसाई, संजय पाटील, विजया पाटील, प्रविण प्रभावळकर, किरण नकाते, भगवान काटे, कार्यालय प्रमुख शंतनू मोहिते आदी उपस्थित होते. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेतील विधानसभा प्रमुखांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या संघटनात्मक कामांची माहिती दिली.
पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत जाणले
प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कोल्हापूर ग्रामीण मंडल अध्यक्ष निवडीसंदर्भात तालुका निहाय पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेऊन प्रत्येकाचे मत जाणून घेतले. आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.
युतीचा निर्णय प्रदेश स्तरावर
आगामी निवडणूक कोणासोबत लढवली जाईल, याचा निर्णय प्रदेश स्तरावर प्रमुख नेतेमंडळी घेतील, परंतु पक्ष संघटना जास्तीत जास्त मजबूत करून पक्षकार्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवणे हा उद्देश असल्याचे भेगडे यांनी सांगितले.