World Records for Amravati to Akola route

अमरावती ते अकोलादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राजपथ इन्फ्राकॉन या खाजगी कंपनीने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवा रेकॉर्ड बनवला आहे(World Records for Amravati to Akola route).

  अकोला : अमरावती ते अकोलादरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (पूर्वीचे ६) वर राजपथ इन्फ्राकॉन या खाजगी कंपनीने सलग १०९.८८ तासात ४२.२०० किमी बिटूमिनस काँक्रीटचे पेविंग करून जगातील सर्व विक्रम मोडून नवा रेकॉर्ड बनवला आहे(World Records for Amravati to Akola route).

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने ही कामगिरी केली आहे. याची नोंद थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. बुधवारी ७ जूनला माना कॅम्प येथे ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे निर्णायक स्वप्नील डांगरिकर यांनी राजपथ इन्फ्राकॉनचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र सुपूर्द केले.

  हा विश्वविक्रम करण्याची सुरुवात ३ जूनला सकाळी ७.२७ वाजता झाली. अमरावती जिल्ह्यातील लोणीपासून अखंड बिटूमिनस काँक्रीट पेव्हिंगच्या कार्याला सुरुवात झाली आणि ७ जूनला रात्री ९.२० वाजता अकोला जिल्ह्यातील नवसाळ येथे १०९.८८ तासांत पेव्हिंगचे कार्य पूर्ण करून ८४.४०० किलोमीटरचा विक्रम करण्यात आला.

  या विक्रमी कामासाठी, प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सुरक्षितता अभियंता, सर्व्हेअर, इतर अनेक कर्मचारी आणि विविध सहयोगी कंपन्यांचे इंजिनिअर, कामगार याची निष्णात चमू अहर्निश तैनात होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टॅडेम रोलर,१ पी टी आर मशीन, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह अभियंते, पर्यवेक्षक, मदतनीस,कारागीर असे एकूण ७२८ योद्ध्यांचे,उच्च ध्येयाने प्रेरित, मनुष्यबळ इथे कार्यरत होते.

  ३४,००० मेट्रिक टन साहित्याचा वापर

  या कामाचा दर्जा राखण्यासाठी आणि तो तपासण्यासाठी सुसज्ज दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा माना कँपला उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरच ३४,००० मेट्रिक टन बिटूमिनससह इतर सर्व साहित्य प्रत्यक्ष कामासाठी वापरण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत, रस्त्याचे चार थर तयार करण्यात आले असून, विक्रमाच्या वेळी हा पाचवा थर टाकण्यात आला.

  या विक्रमाची नोंद करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, गिनीज बुक टीमने मंजूर केलेली २२ तज्ज्ञांची चमू तीन शिफ्टमध्ये परीक्षण करीत होती. या तज्ञांमध्ये सर्वेक्षक, अधिवक्ता, टाइम-कीपर, रस्ता अभियांत्रिकी तज्ञ आणि नामांकित महाविद्यालयांचे डीन यांचा समावेश होता. या सर्व कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंते परीक्षण करीत होते.