Sharad Sonwane's announcement

  नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा तथा स्मारक हे जुन्नर तालुक्यात उभारणार असल्याची घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी आज पिंपळवंडी येथील त्यांच्या रायगड या कार्यालयात केली.
  जगातील सर्वात मोठा पुतळा उभारणार
  येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यानुसार येत्या २९ सप्टेंबर रोजी आपण ज्या पद्धतीने सोशल मीडिया द्वारे म्हणजे समाज माध्यमांद्वारे काहीतरी मोठी घोषणा करणार असल्याचे बोलले होते. ती हीच घोषणा होती का असे विचारताच एकूण चार मोठ्या घोषणा आपण २९ तारखेला करणार आहोत. त्यातील फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळा उभारण्याची घोषणा आज केली आहे. तसेच उर्वरित तीन महत्त्वपूर्ण व मोठ्या घोषणा २९ सप्टेंबर रोजीच करील असे त्यांनी म्हटले आहे.
  शरद सोनवणे यांच्या घोषणेचे स्वागत
  या घोषणेनंतर शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे तसेच जुन्नर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी आमदार शरद सोनवणे यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. खासदार कोल्हे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करून “जुन्नर चे माजी आमदार शरद दादा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या केलेल्या घोषणेचे आपण स्वागत करतो, या शिवकार्यात शिवजन्मभूमीचा मावळा म्हणून सदैव सहकार्य आणि साथ असेल” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
  ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची
   तर चेअरमन सत्यशील शेरकर यांनी “ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची” असे म्हणून “किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची अतुलनीय अलौकिक अद्वितीय अशी घोषणा माजी आमदार शरद सोनवणे यांनी केली, याचे एक शिवभक्त म्हणून मी स्वागत करतो” अशा प्रकारची पोस्ट सत्यशील शेरकर यांनी सोशल मीडियावर केली आहे.
  दरम्यान विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी शरद  सोनवणे यांच्या भूमिकेवर आपले मत व्यक्त केले नाही. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.