प्रसिद्ध लेखक प्रा. हरी नरके यांनी खास शैलीत वाहतूक पोलिसांचा घेतला ‘समाचार’; फेसबुक पोस्ट लिहित कारभाराचे काढले वाभाडे

प्रसिद्ध मराठी लेखक तसेच वक्ते प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कारभारावर त्यांच्या खास शैलीतील लेखनीने शेलक्या अन् हलक्या भाषेत वरभाडे काढत कारभार चव्हाट्यावर आणला आहे.

    पुणे / अक्षय फाटक : प्रसिद्ध मराठी लेखक तसेच वक्ते प्रा. हरी नरके (Hari Narke) यांनी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या कारभारावर त्यांच्या खास शैलीतील लेखनीने शेलक्या अन् हलक्या भाषेत वाभाडे काढत कारभार चव्हाट्यावर आणला आहे. ‘स्व’अनुभवानंतर त्यांनी फेसबुक पोस्ट (Hari Narke FB Post) लिहित प्रचंड गर्दीनंतरही पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग उडालेला बोजवारा नियंत्रित करता येत नसल्याने निष्पाप लोकांना त्रास देण्याचा उद्योग करत असल्याचे म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

    पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. पुणेकरांचे दररोज होत असणारे हाल पाहवत नसताना वाहतूक पोलीस मात्र कोपऱ्यात उभा राहून दंड वसूली करण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. पुणेकरांकडून प्रचंड त्रागा झाल्यानंतर पुढील दोन-चार दिवस वाहतूक पोलीस शांत राहतो अन् पुन्हा वरून आलेल्या डिमांडनुसार कारवाई सुरू केली जाते. गेल्या काही दिवसांत वाहतूक शाखेला सोन्याचे दिवस आल्याचे बोलले जाते. अधिकारी या विभागाचा कारभार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करत असल्याचीही चर्चा आहे.

    पण, वाहतूक शाखा सध्या चर्चेत येण्याचे कारण जरा वेगळेच आहे. त्याच झालं असं, प्रसिद्ध मराठी लेखक तसेच वक्ते व अभ्यासू संशोधक प्रा. हरी नरके स्वारगेट बस स्थानकात पुस्तकांचे पार्सल घेण्यासाठी सोमवारी सकाळी साडे आकराच्या सुमारास दुचाकीवर गेले होते. त्यावेळी त्यांना चौकात आठ दहा वाहतूक पोलीस ‘वसूलीचे’ काम करत असल्याचे दिसले. प्रचंड वाहतूक कोंडी झालेली असताना ती सोडविण्यापेक्षा ते भररस्त्यात वाहने थांबवून मागील वाहनांना अधिक अडथळा निर्माण करत होते.

    प्रा. नरके यांची दुचाकी पाहूनही एक महिला कर्मचारी धावत त्यांच्या दुचाकीच्या आडवी आली व अत्यंत उर्मट आवाजात त्यांनी ‘लायसन्स दाखवा’ असे फर्मान सोडले. पाठीमागे गाड्यांची रांग लागलेली असताना त्या एकदम कुल होत्या. तर नरके यांनी त्यांना लायसन्स दाखवून आमचं काही चुकलं का, असे विचारले. पण, त्या महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना मध्ये बोलून सरकारी कामात अडथळा आणू नका, नाही तर आत टाकीन असे म्हणत बाईंनी दम भरला. त्या इतक्या शांतपणे हे सर्व करत होत्या की त्यात १२ मिनिटे गेली. पण, सर्व ओके असल्याने त्यांचा चेहराच पडला अन् हिरमोड देखील झाला…या सर्व प्रकारावर प्रा. नरके यांनी त्यांच्या खास शैलीत खरपूस समाचार घेत वाहतूक पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत.