ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद निवडणूक आयोगापुढं दाखल; ठाकरे गटाचे म्हणणे आहे तरी काय?

शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले. त्यानंतर शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने जोरदार हालचाली केल्या होत्या.

    मुंबई : शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट तयार झाले. त्यानंतर शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाने जोरदार हालचाली केल्या होत्या. दोन्ही गट धनुष्यबाण चिन्ह (Dhanushya Ban) आणि पक्षाच्या (Shivsena Party Name) नावाबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी म्हणणं पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता ठाकरे गटाकडून लेखी युक्तिवाद निवडणूक आयोगापुढे दाखल करण्यात आला.

    धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष याबाबत गेल्या काही दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता. दोन्ही गटाने आज आपलं म्हणणं लेखी स्वरुपात निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर लेखी युक्तिवाद सादर केला आहे. 30 जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात म्हणणं मांडण्याची आयोगाने मुदत दिली. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे केलेल्या लेखी युक्तिवादात कुठल्याही पातळीवर तपासलं तरी न्यायाची बाजू आमची, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

    चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवलंय

    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली. एकनाथ शिंदे यांना पक्षातील अनेक आमदारांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर पक्षातील सर्वाधिक आमदारांचा आम्हाला पाठिंबा असल्यानं आम्हीच खरी शिवसेना असं म्हणत शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुळ शिवसेना म्हणून चिन्हावर दावा केला होता. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. त्यावर आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.