सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार जाहीर

मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे.

    कराड : मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार (दि.१५) दुपारी १.३० वाजता मिरजच्या बालगंधर्व नाट्यगृहात या पुरस्काराचे वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समितीचे सचिव विठ्ठलराव पाटील यांनी दिली.

    महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान यासह विविध पदांवर काम करून स्वच्छ चारित्र्याचा वस्तूपाठ देशासमोर ठेवणारे नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य, वैचारिक वारसा पुढे नेणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते.

    रविवारी होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार मोहनराव कदम, आमदार अनिल बाबर, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार सुमन पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार विक्रम सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

    यापूर्वी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिवंगत आर.आर. पाटील, वाशिमचे चंद्रकांत ठाकरे, दिवंगत विष्णूअण्णा पाटील, कृषी तज्ज्ञ आप्पासाहेब पवार आदींना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.