
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील भूषणगड येथील श्री क्षेत्र 'हरणाई देवीचा' यात्रा महोत्सव सालाबादप्रमाणे घटस्थापनेपासून दुर्गाष्टमीपर्यंत चालतो.
वडूज : महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील भूषणगड येथील श्री क्षेत्र ‘हरणाई देवीचा’ यात्रा महोत्सव सालाबादप्रमाणे घटस्थापनेपासून दुर्गाष्टमीपर्यंत चालतो. यावर्षीही दुर्गाष्टमीला गडावर मोठी यात्रा भरली होती. भक्तांच्या अलोट गर्दीत देवीचा पालखी सोहळा व यात्रा उत्साहात संपन्न झाली.
श्री हरणाई देवीच्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात घटस्थापने पासून सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये काकड आरती,हरिपाठ,भजन कीर्तन,देवीचा जागर आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.
रविवारी (दि. २२) हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या दिवशी सकाळी देवीची पूजा, आरती तसेच दुपारी बारा वाजता ह भ प विठ्ठल स्वामी महाराज यांचं काल्याचे कीर्तन संपन्न झाल्यावर देवीच्या सजवलेल्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आली. त्यानंतर पालखीची मिरवणूक गडावरून खाली ढोल ताश्यांच्या गजरात श्री म्हसोबा देवस्थान, श्री भुयारी माता येथे आरती करून प्रदक्षिणा करत पुन्हा मंदिरात आणण्यात आली.
श्री हरणाई देवीचा पालखी सोहळा व यात्रेनिमित्त दै नवराष्ट्र चे तालुका प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांच्या वतीने यात्रा विशेष पुरवणी काढण्यात आली, या पुरवणी चं प्रकाशन श्री हरणाई देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी,भूषणगड ग्रामपंचायत पदाधिकारी,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्टच्या वतीने गडावर पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती.गडाच्या पायथ्याशी दुकान दारांनी मेवा मिठाई, पाळणे,लहान मुलांसाठी करमणूक साधनांची दुकाने थाटली होती.औंध व वडूज पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. एकंदरीत यात्रा भक्तांच्या अलोट गर्दीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.