उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

यवतमाळमधील वणी परिसरातील लालपुलीया परिसरातील जुगलकिशोर अग्रवाल यांच्या एफसीआयच्‍या कोल डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली.

    यवतमाळ : यवतमाळमधील वणी परिसरातील लालपुलीया परिसरातील जुगलकिशोर अग्रवाल यांच्या एफसीआयच्‍या कोल डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक अंदाजानुसार ही आग उष्णतेमुळे लागल्याचे बोलले जात आहे. अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्‍या आसपास कोळसा जळून राख झाला असून मोठे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सलग धुसमत असलेल्या या आगीवर अखेर अग्निशमन दलाच्या पाच गाड्यातून फवारा मारून नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे. यामध्ये अंदाजे तब्बल 40 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    उष्णतेमुळे कोळसा डेपोला भीषण आग

    यवतमाळ मार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाच्या मागील बाजूला कोल डेपो आहे. एफसीआयच्या या कोळसा डेपोमध्‍ये अंदाजे चाळीस हजार टन कोळशाची साठवणुक करण्‍यात आली आहे. हा कोळसा गुजरात येथील कंपनीला पाठविण्यात येत असून दररोज केवळ हजार टन कोळश्याची वाहतूक होत असल्याने या ठिकाणी सहा ते सात रॅक कोळशाची साठवणुक होती. होळीच्या दिवशी साठवणूक केलेल्या कोळशाला अचानक आग लागली आणि त्यानंतर या आगीने रौद्ररूप धरण करत संपूर्ण डेपोवर ताबा मिळवला. यात एक मशीनसुद्धा जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.

     दहा हजार टन कोळशाची राख

    अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची माहिती प्राप्त झाली. उष्णतेमुळे अचानक लागलेल्या या भीषण आगीत सुमारे दहा हजार टनाच्‍या आसपास कोळसा जळून राख झालाय. आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाल दोन दिवसाचा कालावधी लागला. गेल्या काही महिन्यांपासून कोळशाच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने या ठिकाणी एवढ्या मोठ्याप्रमाणात कोळशाची साठवणूक करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. परंतु हजारो टन कोळसा साठविण्यासाठी त्या ठिकाणी अग्निशामकयंत्रासह मुबलक पाण्याची सोय असणे आवश्यक आहे. मात्र, ही व्यवस्था डेपोवर कुठेही दिसून आली नाही. परिणामी मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान या आगीत झाले आहे.