आज संपूर्ण विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट

    मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. परतीच्या पावसासाठी राज्यात पोषक वातावरण तयार झालं असून हवामान विभागानं (Meteorological Department) सांगितलेल्या अंदाजानुसार, आज ६ ऑक्टोबर रोजी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यलो अलर्टमध्ये (Yellow Alert) हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

    काल बुधवारपासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. ५ ते १० ऑक्टोबर या कालावधीत राज्यातून मान्सून माघारी फिरणार आहे. अशातच आज हवामान विभागानं राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    यंदा जून महिन्यात पावसाची रिपरिप सुरु झाली होती, तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात मात्र राज्यात तुफान पाऊस झाला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, दमदार पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. मात्र राज्यातील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.