अखिल भारतीय आंतर कारागृह बुद्धिबळ स्पर्धेत येरवडा कारागृहाचा सलग दुसरा विजय

  पुणे : या स्पर्धेत भारतातील विविध राज्यांमधील 19 मध्यवर्ती कारागृहातील बंदीच्या संघांनी भाग घेतला होता.
  शनिवारी  पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर कारागृह बुद्धिबळ स्पर्धेत सर्व फेऱ्यांमध्ये अपराजित राहत येरवडा मध्यवर्ती कारगृह संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान मिळविला. परिवर्तन – प्रिझन टू प्राईड या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या उपक्रमांतर्गत अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने ही स्पर्धा आयाेजित केली हाेती. आयोजित केलेल्या या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.

  अंतिम 4 संघांची निवड

  नुकतेच 6 प्राथमिक फेऱ्या खेळवल्या गेल्या, त्यातून अंतिम 4 संघांची निवड करण्यात आली. यामध्ये 6 पैकी 6 सामने जिंकत येरवडा कारागृह पुणे संघ प्रथम स्थानावर राहिला. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक आंतर कारागृह स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला. येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे, भुवनेश्वर आणि बंगलोर कारागृह असे तीन संघ या स्पर्धेतून जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

  अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे

  स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे पवन कातकडे हे स्पर्धा अधिकारी म्हणून उपस्थित होते. कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयाेजित केली.

  योगेश परदेशी हे उपक्रमाचे समन्वयक

  या उपक्रमांतर्गत केतन खैरे हे कारागृहातील बंदींना प्रशिक्षण देत आहेत. योगेश परदेशी हे उपक्रमाचे समन्वयक आहेत. ऑनलाईन स्पर्धा व त्याच्या सरावासाठी लागणाऱ्या कॉम्प्युटर, नेटवर्किंगचे तांत्रिक साहाय्य  गणेश माळकरी करीत आहेत. यासाठी ग्रॅंड मास्टर श्री अभिजित कुंटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेतील सहभागी बंदी संघाला कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, डॉ. भाईदास ढोले, पल्लवी कदम, रवींद्र  गायकवाड, एच एच जगताप, अानंद कांदे, वि. के. खराडे सुभेदार अधिकाऱ्यांनी स्पर्धेचे नियाेजन केले.