
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतकी चमत्कारिक स्थिती कधी निर्माण झाली नव्हती. वैचारिक घुसमट होत असल्याचे कारण सांगून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावले आणि इतक्या जलद गतीने राजकीय उलथा पालथी झाल्या की, भलेभले राजकीय विश्लेषक सुद्धा गोंधळून गेले. महाराष्ट्रातील या राजकारणाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले असून कालचे शत्रू आज मित्र बनले आहेत.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर संजय मंडलिक हे शिवसेनेचे उमेदवार होते. या दोघांमध्ये घमासान लढत झाली. या लढतीत काँग्रेसच्या सतेज पाटील यांनी आघाडी धर्म बाजूला ठेवून संजय मंडलिक यांना महाडिक विरोधात सर्व प्रकारची रसद पुरवताना आमचं ठरलंय ही टॅग लाईन महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनवली होती. संजय मंडलिक विजयी झाले आणि आता हेच संजय मंडलिक शिवसेनेला जय महाराष्ट्र करून दिल्लीकडे रवाना होताना त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली होती. राज्यसभेचे खासदार असलेले धनंजय महाडिक यांनीच हा गवत्या स्पोर्ट करून कोल्हापूरच्या राजकारणात आता संजय मंडलिक हे आमचे राजकीय मित्र बनले असल्याचेही सांगून त्यांनी सतेज पाटील यांना धक्का दिला आहे.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मंडलिकांचा सेनेला ‘जय महाराष्ट्र’
दोन महापालिकांच्या निवडणुकीमध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा भाजपा तसेच ताराराणी आघाडीला कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही; पण संजय मंडलिक यांना मात्र या नव्या मित्रांचा फायदा लोकसभा निवडणुकीत होणार आहे.
सतेज पाटीलांना आता दोन शत्रूंशी लढा
संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांच्याशी मैत्र प्रस्थापित केल्यानंतर अर्थात त्यांच्याविरुद्ध सतेज पाटील हे शत्रुस्थानी असणार आहेत. तर कोल्हापूरच्या राजकारणात सतेज पाटील यांना आता दोन शत्रूंशी दोन हात करावे लागणार आहेत. हे दोन्ही राजकीय शत्रू भविष्यामध्ये गोकुळ दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक या दोन मोठ्या संस्थांमध्ये आव्हान उभा करू शकतात. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. आणि लोकसभेनंतर गोकुळ तसेच जिल्हा बँक येथील निवडणुकीची नांदी सुरू होणार आहे. या दोन महत्त्वाच्या संस्थांमध्ये संजय मंडलिक यांना सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्याकडून फारसे महत्त्व दिले गेलेले नाही.
मित्र आणि शत्रूंची अदलाबदल
आजवरच्या कोल्हापूरच्या राजकारणात मित्रांची, शत्रूंची सतत अदलाबदल होत राहिलेली आहे. महादेवराव महाडिक यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा विडा सदाशिवराव मंडलिक यांनी काही वर्षांपूर्वी उचलला होता. गोकुळच्या सत्ताकारणात रणजितसिंह पाटील यांना स्थान दिले तर मी स्वतंत्र पॅनल उभा करेन प्रसंगी सतेज पाटील यांची मदत घेईन; असा इशारा सदाशिवराव मंडलिक यांनी महादेवराव महाडिक यांना दिला होता. आता त्याच सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव खासदार संजय मंडलिक हे महाडिक गटाचे मित्र बनलेले आहेत. विशेष म्हणजे सदाशिवराव मंडलिक यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. आणि त्याच सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनाच पराभूत केले होते. मात्र आता ही दोघेही राजकीय शत्रुत्व विसरून मित्र झाले आहे.