कालची सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या निरोपाची – आमदार नितेश राणे

मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केलं? हे त्यांना सांगता आले नाही. त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर फक्त त्यांनी टीका केली.

  कणकवली विधानसभा मतदारसंघात आम्ही अनेक विकास कामे केल्यामुळे विरोधकांकडे उमेदवार नाही. शेवटी नितेश राणे यांना रोखू शकत नसल्याने कणकवलीत सभा घेत शिव्या घालण्याचे काम काही भटक्या कुत्र्यांकडून झाले. मोदींच्या नेतृत्वात खासदार झालेल्या विनायक राऊत यांनी गेल्या १० वर्षात काय केलं? हे त्यांना सांगता आले नाही. त्यामुळे भाजपा आणि राणे कुटुंबियांवर फक्त त्यांनी टीका केली. एकीकडे टीका करायची आणि दुसरीकडे भाजपा सोबत विनाअट युती करण्यासाठी प्रस्ताव उद्धव ठाकरे देत आहेत. कालची उबाठाची सभा म्हणजे विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा झाली असल्याची टीका भाजपा आ. नितेश राणे यांनी केली.

  कणकवलीतील आयोजित पत्रकार परिषद
  पुढे नितेश राणे म्हणाले, आमच्या कणकवलीत नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची सभा झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत चालला आहे. त्यामुळे वारंवार जिल्हा प्रशासनाला मी पत्र दिले आहे. तरीही रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला नाहक त्रास झाला. मला असंख्य लोकांचे फोन आले, नितेशजी चिडू नका. ज्यांनी ज्यांनी सभेच्या माध्यमातून तुमच्यावर टीका केली, त्यांना उत्तर आम्ही मतदानातून देणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून गावागावात विकासकामांची भूमिपूजने केली, मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. विकास करण्यासाठी माझ्या मतदारांनी गेल्या १० वर्षापासून निवडून दिले आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने वातावरण खराब करायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे.

  उद्धव ठाकरे हे किती मोठे गद्दार आहेत, हे राज्याने पाहिले होते. त्यावेळी भाजपसोबत युती असताना कणकवलीत माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार उभा केला. स्वतः जाहीर सभा घेतली. तरीही २०१९ मध्ये मोठ्या मताधिक्याने मी विजयी झालो. ग्रामपंचायत निवडणुकीत ८० टक्के पेक्षा जास्त सरपंच भाजपाच्या विचारांचे निवडून आले आहेत. काही त्यांचे आले तेही आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. तसेच काल जे स्टेजवर होते, त्यांचेही चॅनेल लवकरच बदलेल. स्टेजवर काही लोक बसलेले ते आमच्याकडे प्रवेशासाठी वेटींगवर आहेत. माझे आणि जनतेचे अतुट नाते आहे. जो कोण विरोधी उमेदवार उभा राहील त्याच्या विरोधात मी लढणार आहे. कालच्या सभेत जिल्हा आणि राजापूरमधून लोक आणले. कोकणात बाळासाहेब ठाकरे यांची लाखोंची सभा होत होती. आता उद्धव ठाकरे कॉर्नर सभा घेत फिरत असल्याची टीका नितेश राणे यांनी केली.

  विनायक राऊत यांची शेवटची निवडणूक आहे. आम्हाला कोणालाही टीका करायची नाही. आता माझ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आलेले आहेत. संघाच्या विचारधारा असलेली पुस्तके मी वाचत आहे. त्यामुळे या मतदारसंघात विकासाच्या मुद्यावर आम्ही बोलू. एका बाजूला बोलायचे राणे संपले, मग तुम्हाला बांदा ते खारेपाटण राणेंचे नाव घेतल्याशिवाय सभा होत नाही, गर्दी होत नाही, टाळ्या पडत नाहीत. भाजप खोल लोकांमध्ये रुजलेला पक्ष आहे, याचे उदाहरण कालच्या दौऱ्यात आले. माझ्या मतदारसंघात मी वातावरण खराब करणार नाही. या लोकसभा निवडणुकीत जो कोण उमेदवार असेल त्याच्या विजयात कणकवली मतदार संघाचा सिंहांचा वाटा असेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

  इंडिया आघाडी तिथे जागा वाटप करत आहे, तर त्यांच्या पाठीत खंजीर खुपसायला उद्धव ठाकरे तयार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा खरा मुलगा उद्धव ठाकरे आहे का? यांचा डीएनए तपासला पाहिजे. मी जनतेचा विकास करीत राहणार, जो काय तो त्रास द्या. भटके कुत्रे कितीही बोला. ज्याच्याकडे स्वतःचा पक्ष नाही. त्याला भाजपाला तडीपार करायची लायकी आहे का? दिशा सलियान केसचा निकाल लागल्यानंतर स्वतःचे कुटुंब घेऊन ठाकरे तडीपार होणार आहेत. भास्कर जाधव यांच्यासारखी फोंडा बाजारपेठेत माणसे भेटतात. भास्कर जाधव यांनी अनेकदा त्यांची इज्जत काढली हे ठाकरे यांना कळलं नाही. हा गुणगान गातो, तो त्यांच्या मुलाला गे बोलायचा, त्याबाबत पुरावे द्यायला माझ्याकडे दोन, तीन आमदार आहेत. ठाकरेंनी आपली लायकी बघून मोदींवर बोलावं, राजकोट किल्ला झाल्यापासून पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची किंमत मोदींना चांगली माहीत आहे. ठाकरे यांना किंमत माहीत आहे का? त्यांच्या गळ्यातील रुद्राक्ष कुठे टाकले ते सांगा, असा टोला आ. नितेश राणे यांनी लगावला.

  उद्धव ठाकरे हे काल वैभव नाईक यांच्या घरी राहिले, त्यांना ठाकरे वहिनींनी नक्की विचारले असेल तुझ्याकडे एवढी संपत्ती कशी आली? काही भाग मातोश्रीवर पोहचवले नाही का? खा. विनायक राऊत यांचे प्रगती पुस्तकं दाखवा, गेली १० वर्षे काय केलं? फक्त राणेंना बोलणं हे सभेत केलं. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा भटक्या कुत्र्यांकडून किती ग्रामपंचायत आल्या? त्याचा आढावा घेतला पाहिजे होता. जर पंतप्रधान उद्धव ठाकरे होणार असतील तर पाकिस्तानचे होतील, असा टोला आ.राणे यांनी लगावला.