
नाशिकमधील निखिल भामरे नामक फार्मासिस्ट तरुणाने पवारांविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याचे ‘बागलाणकर’ असे युजरनेम होते. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि १८ मे रोजी त्याला अटक करण्यात आली.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे(NCP) सर्वेसर्वा शरद पवारांबाबत(Sharad Pawar) सोशल मीडियावर (Social Media) कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने ( High Court, Mumbai) राज्य सरकारला (Maharashtra State Government) खडेबोल सुनावले. तुम्हीच जर अशी कृती केलीत तर दुसऱ्या क्रमांकावरील सर्वोच्च नागरी सन्मान (पद्मविभूषण) मिळालेल्या शरद पवारांच्या नावाला गालबोट लागेल. एका विद्यार्थ्याला अशा प्रकारे तुरुंगात डांबणे हे पवारांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वालाही आवडणार नाही, असा शब्दांत न्यायालयाने सरकारला सुनावले.
नाशिकमधील निखिल भामरे नामक फार्मासिस्ट तरुणाने पवारांविरोधात सोशल मिडीयावर आक्षेपार्ह ट्विट केले होते. त्याचे ‘बागलाणकर’ असे युजरनेम होते. जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यानंतर, ठाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरेविरोधात ठाणे पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि १८ मे रोजी त्याला अटक करण्यात आली. नाशिक, ठाणेसह अन्य ठिकाणीही भामरेविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका भामरेंच्यावतीने दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्या. एस. एस. शिंदे आणि एन. एम. जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
दररोज शेकडो आणि हजारो ट्विट केली जातात. तुम्ही प्रत्येक ट्विटची दखल घेणार आहात का? आम्हाला अशा प्रकारच्या एफआयआर नको आहेत, असे न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता राज्याच्या वकिलाला तोंडी सांगितले. तसेच सदर विद्यार्थ्याने केलेल्या आक्षेपार्ह कृत्याबद्दल जवळपास महिनाभर कारागृहात डांबून ठेवणे योग्य वाटणार नाही. त्याच्या याचिकेला विरोध न करण्याच्या राज्याच्या कृतीमुळे एका होतकरू तरुणाला वाईट मार्गापासून परावृत्त होण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही खंडपीठाने नमूद केले.
याच प्रकरणी भामरेसह मराठी अभिनेत्री केतकी चितळेलाही अटक करण्यात आली असून तिच्या याचिकेवर बुधवारी युक्तिवाद होणार आहे.