युवक काँग्रेसचे भाजपा कार्यालयासमोर आंदोलन; लष्करासाठीची ‘अग्निपथ’ योजना व राहुल गांधींवरील ईडी कारवाईचा केला तीव्र निषेध

केंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेचा विरोध, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील 'ईडी' कारवाईचा निषेध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले.

  पुणे : केंद्र सरकारने सैन्य दलातील भरतीसाठी जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील ‘ईडी’ कारवाईचा निषेध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला.

  महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, सरचिटणीस प्रथमेश आबनावे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. प्रसंगी प्रदेश सरचिटणीस स्नेहल डोके, अनिकेत नवले, जयदीप शिंदे, अक्षय जैन, चिटणीस अनिकेत अरगडे, सातारा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पुणे शहर उपाध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय माने, धनराज माने यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. अखेर आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

  शिवराज मोरे म्हणाले, “मोदी सरकारकडून ईडीसह इतर तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. या यंत्रणांना पुढे करून विरोधी पक्षांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. हे लोकशाहीला अतिशय घातक आहे. ‘अग्निपथ’सारखी योजना आणून देशातील युवकांच्या भवितव्याशी आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेशी खेळ सुरु आहे. लष्करात जाण्याचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या लाखो मुलांना कंत्राटीकरणाच्या खाईत ढकलणारी ही अग्निपथ योजना आहे. ही योजना रद्द करून तपासयंत्रणाचा गैरवापर बंद करण्याची आमची मागणी आहे.”

  प्रथमेश आबनावे यांनी मोदी सरकारचा निषेध करत ‘अग्निपथ’ योजनेमुळे तरुणांचे आणि देशाचे मोठे नुकसान होणार असून, वेळीच ही योजना रद्द करावी, अशी मागणी केली. राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांचा आवाज दडपण्यासाठी मोदी सरकार ईडीची कारवाई सूडबुद्धीने करत असल्याचे राहुल शिरसाठ म्हणाले.

  दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत खडाजंगी

  भाजप कार्यालयासमोर आंदोलन केल्याने भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. युवक काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.