पंतप्रधानांच्या फोटोला काळं फासणं युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत यांना भोवलं; पोलिसांकडून अटक

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना कुही येथून अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. शनिवारी जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

    नागपूर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना कुही येथून अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते. शनिवारी जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी एका फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्यात आले होते. हा प्रकार त्यांना चांगलाच भोवला आहे. ते माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव असून, काँग्रेसकडून रामटेक लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय योजनांचे बॅनर लावण्यात आले आहे. केंद्राशी संबंधित योजनांच्या बॅनरवर पंतप्रधानांच्या फोटोसह मोदी की गॅरंटी असा उल्लेख आहे. यांबाबत काँग्रेसकडून टीकेची झोळही उठविली जात आहे. त्यातच शनिवारी कुणाल राऊत आपल्या 20 ते 25 समर्थकांसह जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारात पोहोचले. तिथे मोदींचे नाव हटवून भारतचे स्टिकर लावले. सोबतच फलकावरील मोदींच्या फोटोला काळे फासले. या प्रकारावरून सदर पोलिसांनी अनधिकृतपणे आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकासान केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

    पोलिसांकडून सीआरपीसीचे कलम 41- ए अंतर्गत कुणाल राऊत यांना नोटीसही बजावण्यात आली होती. त्यांना सोमवारी दुपारी 12 पर्यंत ठाण्यात चोकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. पण, त्यापूर्वी रविवारीच त्यांना तडकाफडकी अटक करण्यात आली. ते रविवारी कुही परिसरात जनसंबाद यात्रेवर निघाले होते. त्याची माहिती मिळताच सदर पोलिसांचे पथक कुहीत दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेऊन नागपुरात आणण्यात आले.