उद्योगनगरीतील तरुणाई नशेच्या विळख्यात; गांजा, हुक्का सहज उपलब्ध

पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे. शहरात सहजपणे गांजा, हुक्का यासारखे झिंग होणारे अमली पदार्थ सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. शहरात परराज्यातून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गांजापाठोपाठ दुडा चुराच्या नशेत पिंपरी-चिंचवडमधील अनेक तरुण झिंगत आहेत.

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील तरुणाई नशेच्या विळख्यात अडकली आहे. शहरात सहजपणे गांजा, हुक्का यासारखे झिंग होणारे अमली पदार्थ सर्रासपणे उपलब्ध होत आहेत. शहरात परराज्यातून अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. या हुक्कासोबत अफूच्या ‘दुडा चुरा’ या अमली पदार्थाचे प्रमाण सर्वाधिक आहे. गांजापाठोपाठ या दुडा चुराच्या नशेत पिंपरी-चिंचवडमधील अनेक तरुण झिंगत आहेत.

    पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे, पिंपरी चिंचवड सह राज्यातील ड्रग्स तस्करी वर आवाज उठवला होता. त्यानंतर ललित आणि भूषण पाटील ड्रग्स रॅकेट किती मोठ्या स्वरूपात पुण्यात सुरु आहे हे समोर आले. त्यामुळे अगोदरच ड्रगच्या नशेत असणारे पुणे पिंपरी चिंचवड आता गांजा, दुडा चुरा आणि हुक्का यामध्ये बुडाला आहे.

    सहज उपलब्ध होत असल्याने तरुणांसह शौकिनांकडून गांजाला पसंती दिली जात आहे. त्यात आता ‘दुडा चुरा’ या अमली पदार्थाची भर पडत आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातून या अमली पदार्थाची तस्करी होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड उद्योगनगरी गांजासह दुडा चुराच्या विळख्यात सापडली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, एमआयडीसीतील कामगार तसेच उच्चभ्रू वर्गातील अनेक जण दुडा चुराच्या आहारी जात आहेत. यात उत्तर भारतातून शहरात दाखल झालेल्यांची संख्या लक्षणीय आहे.

    खासगी ट्रॅव्हल्स बसमधून गुजरातमार्गे मुंबई-पुणे महामार्गावर पोत्यांमधून ‘दुडा चुरा’ आणला जातो. त्यानंतर चारचाकी वाहनांमधून शहरातील दोन ठिकाणी हा अमली पदार्थ पोहचविला जातो. तेथून त्याचे वितरण होते. खासगी बसने आठवड्यातील दोन दिवस दुडाचुराची वाहतूक केली जाते. शहरात महामार्गावर सकाळच्या वेळी पोती उतरवली जातात. दिवसाढवळ्या होणाऱ्या तस्करीकडे अमली पदार्थ विरोधी पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

    दुडा चुरा सेवन करणे कायद्याने गुन्हा

    खासगी बसमधून आणलेला हा दुडा चुरा म्हणजे आयुर्वेदिक काढा बनिवण्यासाठीची वनस्पती आहे, असे सांगितले जाते. पाण्यात मिसळून त्याचे पेय तयार केले जाते. तसेच दुडा चुरा हा तंबाखू प्रमाणे देखील विक्री केला जातो. दुडा चुरा रात्री पाण्यात भिजवून ठेवला जातो. चुरामधील अर्क पाण्यात उतरतो. ते पाणी सकाळी घेतल्यानंतर दिवसभर अंगमेहनतीचे काम सहज करता येते, असा समज आहे. या दुडा चुरामुळे नशा होऊ शकते. त्यामुळे दुडा चुरा सेवन करणे कायद्याने गुन्हा आहे. सहज उपलब्ध होतो म्हणून गांजा सेवन केला जातो. मात्र, त्याला पर्याय म्हणून ‘दुडा चुरा’ला पसंती दिली जात आहे. तसेच पाण्यात भिजवून देखील तो सहज सेवन करता येतो. त्यामुळे अनेक तरुण ‘दुडा चुरा’च्या आहारी जात आहेत.

    पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अमली पदार्थ सारख्या अवैध विक्री रोखण्यासाठी एक युनिट आहे. या युनिटच्या माध्यमातून अश्यांवर कारवाई केली जात आहे.

    - सतीश माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा.