तळेगावात किरकोळ कारणावरून तरूणांचा खून

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून चौघांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास निलया सोसायटी समोर तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे येथे घडली. खुनाच्या घटनेने मावळ तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वडगाव मावळ : कृष्णा शेळके (रा. तळेगाव दाभाडे)  असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा शेळके हा त्याच्या दोन मित्रांसोबत निलया सोसायटी समोर थांबला होता. त्यावेळी तिथे आलेल्या अनोळखी चार जणांनी कृष्णा याला इथे का थांबलास असे विचारले. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. सुरुवातीला कृष्णा याने आरोपींना मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कृष्णाला देखील मारहाण केली. या मारहाणीमध्ये कृष्णाचा मृत्यू झाला.
    घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.