धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून; सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  पुणे : जागेच्या वादविवादातून नातेवाईक तरुणाचाच धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. धायरी येथील रायकर मळा येथे ही घटना घडली. आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय १९, रा. खंडोबाचा मळा, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्यचे नातेवाईक संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

  काही वर्षांपासून वाद सुरु

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य व आरोपी नातेवाईक असून त्यांच्यात जागेवरून गेल्या काही वर्षांपासून वाद सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता या वादग्रस्त जागेवर आदित्य कामगारांसह पत्र्याच्या शेडचे काम करत होता त्यावेळी आरोपी संपत काळोखे व सागर रायकर हे त्याठिकाणी आले. आदित्य व संपत यांच्यात वाद झाला. यानंतर दोघांनी आदित्य याच्या पाठीत धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

  अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल

  त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. याबाबत माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

  नातेवाईकांचा चौकीतच ठिय्या…
  आदित्य याच्या खूनानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसेच, नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्यानंतरही हजर केले जात नाही यासाठी पोलीस चौकीत ठिय्या आंदोलन केले. तर, मृतदेह ताब्यात घेण्यास देखील विरोध केला. पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन देत कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.