अंबाजोगाई येथील शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमादरम्यान तरुणांनी केली दगडफेक; दोन शिक्षक जखमी

बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर शाळेच्या स्नेहसंमेलनानिमीत्त सुरु असलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमास तरुणांना येण्यास शिक्षकांनी मज्जाव केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी अचानकपणे शाळेवर केलेल्या दगडफेकीत एका शिक्षकाचे डोके फुटले तर दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयात घडली आहे.

    बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील खोलेश्वर शाळेच्या स्नेहसंमेलनानिमीत्त सुरु असलेल्या सांस्कृतीक कार्यक्रमास तरुणांना येण्यास शिक्षकांनी मज्जाव केला. यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी अचानकपणे शाळेवर केलेल्या दगडफेकीत एका शिक्षकाचे डोके फुटले तर दोन शिक्षक जखमी झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयात घडली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीसात 15 जनांवर गुन्हा दाखल झाला आहे.

    अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर विद्यालयात दि. 25 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान स्नेहसंमेलनानिमित्ताने सांस्कृतीक कार्यक्रम सुरु होता. यावेळी शाळेच्या बाहेरील काही तरुण कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेच्या गेटवर शिक्षकांशी हुज्जत घालीत होते. परंतू शिक्षकांनी त्यांना कार्यक्रमास येऊ दिले नाही. यामुळे संतप्त झालेल्या 10 ते 15 तरुणांनी शाळेवर दगडफेक केली.

    दरम्यान या दगडफेकीत शाळेतील शिक्षक शैलेंद्र कंगळे यांचे डोके फुटले तर इतर दोन शिक्षक जखमी झाले. यावेळी शाळेकडून पोलीसांना पाचारण केल्यांनतर हे तरुण पळून गेले आल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव दगडोबा आडे (वय 57) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 10 ते 15 तरुणाविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनचे हवालदार गायकवाड करीत असल्याचे देखील संबंधित पोलिस स्टेशनच्या वतीने सांगण्यात येत आहे.