पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या तरुणाला अटक, सिंहगड रोड पोलिसांची कारवाई; एक पिस्तूल जप्त

देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या एकाला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. नर्हे परिसरात या कारवाईचा थरार झाला आहे.

    पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यास आलेल्या एकाला सिंहगड रोड पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. नर्हे परिसरात या कारवाईचा थरार झाला आहे. वैभव विजय वाल्हेकर (वय २९,रा. कामथडी, ता. भोर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजुरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, शंकर कुंभार, रवींद्र अहिरे, अमोल तांबे, माने आदींनी ही कारवाई केली.

    शहरात पाहिजे व फरार आरोपींची माहिती घेण्यात येत आहे. यादरम्यान, सिंहगड रोड पोलिसांचे पथक नऱ्हे भागात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नर्हेतील एका नामांकित हॉटेलजवळ एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल तांबे आणि माने यांना मिळाली. त्यानूसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने या भागात सापळा लावला.

    तसेच, छापा कारवाई करून वाल्हेकर याला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना पिशवीत देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस सापडले. त्यानूसार, त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा नोंदकरत अटक केली आहे. वाल्हेकर पिस्तुलाची विक्री कोणाला करणार होता तसेच त्याने ते कोणाकडून घेतले यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.