रेल्वेत नोकरीच्या आमिषाने तरुणांना गंडा; ‘टीसी’चे बनावट नियुक्तीपत्र दिले अन् 9 लाखांची फसवणूक केली

रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्या तीन भामट्यांना चिखली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. एक लाख रुपये उकळून या भामट्यांनी रेल्वे टीसीसह अन्य एका पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ते तरुणांच्या हाती दिले.

    चिखली : रेल्वे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लुबाडणाऱ्या तीन भामट्यांना चिखली पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. एक लाख रुपये उकळून या भामट्यांनी रेल्वे टीसीसह अन्य एका पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ते तरुणांच्या हाती दिले. मात्र, सर्वकाही बोगस असल्याने युवकांनी पोलिस ठाणे गाडून आपली कैफियत मांडली. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणून सुशिक्षित बेरोजगारांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला.

    तालुक्यातील एकलारा येथील रहिवासी व चिखली येथे वास्तव्यास असलेल्या सुधीर जगदेव अंभोरे (वय 27) या युवकाला आरोपी संजय विठोबा खाटोकर (वय 40 रा. सावखेड नागरे, ता. देऊळगाव राजा), प्रियेश हरेश्वर जाधव (वय 30, रा. बेलवली बदलापूर, जि. ठाणे), अशोक पंजाबराव वाळके (वय 42, रा. जनता कॉलनी सिपना कॉलेज रोड, अमरावती) व राकेश पाटील (सुरत) यांनी रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून 7 लाख रुपये उकळले. तसेच याच पद्धतीने रवी गाडेकर याच्याकडूनही 2 लाख रुपये घेतले. दोन्ही युवकांना बनावट कागदपत्रे बनवून खोटे नियुक्तीपत्र देण्यात आले.

    नॉर्थन रेल्वेचा टीसी म्हणून बनावट नियुक्तीपत्र तसेच भारतीय रेल्वेचे अनाउन्सर अॅण्ड इंडिकेटर ऑपरेटरचे ओळखपत्र देण्यात आले. सर्व काही बनावट असल्याने आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. त्यानुसार सुधीर अंभोरे याने पोलिसांत तक्रार दिली.

    नाकाबंदीदरम्यान दुसरा आरोपीही जेरबंद

    दुसरा आरोपी अशोक पंजाबराव वाळके हा अमरावती येथून संभाजीनगर येथे जात असल्याचे समजले. त्यानुसार चिखली येथे नाकाबंदी करण्यात आली. यादरम्यान त्यालाही अटक करण्यात आली.