सासरच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या; पत्नीसह सासरकडील नातेवाईकांवर गुन्हा दाखल

सासरच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पुणे : सासरच्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल बबन वाघमोडे (वय ३७, रा. माळवाडी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
    वाघमोडेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी तेजश्री अतुल वाघमोडे, सासू दुर्गा साळुंके, सासरे हिरामण साळुंके, नितू लोखंडे, प्रवीण लोखंडे यांच्यासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अतुलचा भाऊ अमित (वय ३५) याने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
    अतुलचा तेजश्रीशी विवाह झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. वादातून तेजश्री आणि सासरकडील नातेवाईकांनी अतुलला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्रासामुळे अतुलने राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने चिठ्ठी लिहिली होती.
    अतुलने आत्महत्या करण्यापूर्वी भाऊ अमितशी संपर्क साधून त्याला त्रासाबाबतची माहिती दिली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. अतुलच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पत्नीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी तपास करत आहेत.