पवार घरण्यातून आणखी एक व्यक्ती येणार राजकारणात? विविध चर्चांना उधाण

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शिक्कमोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात असताना, त्यांचे पुतणे व उद्योजक श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

    बारामती / अमोल तोरणे : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शिक्कमोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तविली जात असताना, त्यांचे पुतणे व उद्योजक श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांचे चिरंजीव युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

    सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत जाणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अप्रत्यक्षरीत्या या चर्चेला दुजोरा दिला आहे. अजित पवार यांनी सोमवारी (दि १७) त्यांच्या उपस्थित होणाऱ्या सासवड येथील शेतकरी मेळाव्यासह अन्य कार्यक्रमांना अनुपस्थित राहून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अजित पवार यांच्या संभाव्य बंडाची चर्चा माध्यमांमध्ये चांगली रंगली असताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मात्र सोमवारी बारामतीमध्ये युगेंद्र पवार अध्यक्ष असलेल्या बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्ती पाहण्यात दंग होते.

    दरम्यान, शरद पवार यांनी यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँगेस महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान अजित पवार यांचे छोटे बंधू असलेले श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार गेल्या अनेक दिवसांपासून बारामती परिसरातील सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. तीन वर्षांपूर्वी महाऑरगॅनिक रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन (मोर्फा) या सेंद्रीय शेती उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

    माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार सेंद्रिय शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेती उत्पादकांचे अनेक वेळा मेळावे ही घेण्यात आले होते. यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी युगेंद्र पवार यांची निवड करण्यात आली आहे. यादरम्यान बारामती शहरातील विविध महापुरुषांची जयंती उत्सव तसेच दहीहंडी उत्सव व इतर कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत आहे. श्रीनिवास पवार यांच्या पत्नी व युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये मोठे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत.

    सोमवारी (दि. १७) शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन योगेंद्र पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. दरम्यान दिवाळी पाडव्या दिवशी गोविंद बाग या ठिकाणी पवार कुटुंबीयांना राज्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी भेटण्यासाठी येत असतात. या ठिकाणी शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्या समवेत युगेंद्र पवार देखील शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र हे अनेक वेळा दिसत आहेत.

    …तर राष्ट्रवादीला पडणार मोठे भगदाड

    सध्या अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाल्यास बारामतीतील राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडणार आहे. त्यामुळे बारामतीमध्ये राष्ट्रवादीला नव्या चेहऱ्याची गरज निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ मधून खासदार होण्यासाठी इच्छुक आहेत.

    गेल्या निवडणुकीत पार्थ यांचा झालेला पराभव पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. अजित पवार भाजपमध्ये गेल्यास पार्थ पवारांचा राजकीय प्रवास सोपा होणार आहे. एकंदरीत रोहित पवार यांच्या नंतर युगेंद्र पवार देखील राजकारणात सक्रिय होणार असल्याची दाट शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.