पालघरमध्ये विद्यार्थिनीला झिका व्हायरसची लागण; एनआयव्हीचा आहवाल

पालघरमधील झाई आश्रम शाळेतील एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा सहा दिवसांपूर्वी ताप आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर एकूण १३ विद्यार्थ्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एका सात वर्षीय विद्यार्थिनीच्या रिपोर्टमध्ये झिका व्हायरस आढळून आला आहे.

    मुंबई : जिल्ह्यातील झाई गावातील आश्रम शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय मुलीला झिका व्हायरसची (Zika Virus) लागण झाल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एनआयव्ही (NIV) प्रयोगशाळेत या मुलीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते. त्याच्या अहवालानंतर या मुलीला झिकाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. सध्या या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती आहे.

    राज्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा दुसरा रुग्ण सापडला आहे. पालघरमधील (Palghar) झाई आश्रम शाळेतील (Zai Ashram School) एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीचा सहा दिवसांपूर्वी ताप आल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर एकूण १३ विद्यार्थ्यांना डहाणू उपजिल्हा रुग्णालयात (Dahanu Sub District Hospital) दाखल करण्यात आले. यापैकी एका सात वर्षीय विद्यार्थिनीच्या रिपोर्टमध्ये झिका व्हायरस आढळून आला आहे. व्हायरसची प्रमुख लक्षणे ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला अशी आहेत. सध्या या विद्यार्थिनीवर डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.