जिल्हा परिषद लाचेच्या विळख्यात; शाखा अभियंत्याला दोन हजाराची लाच घेताना पकडले

जिल्हा परिषद लाचेच्या विळख्यात सापडली आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराची लाच घेताना अटक होऊन केवळ पंधरा दिवस पार पडत असतानाच बार्शी पंचायत समितीतील शाखा अभियंता दोन हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे.

    सोलापूर : जिल्हा परिषद लाचेच्या विळख्यात सापडली आहे का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराची लाच घेताना अटक होऊन केवळ पंधरा दिवस पार पडत असतानाच बार्शी पंचायत समितीतील शाखा अभियंता दोन हजाराची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले आहे.

    आयुब शेख असे २ हजाराची लाच घेताना अटक झालेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी बार्शी तालुक्यातील नारी या ठिकाणी समाज कल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेतून काम केले होते. त्या कामाचे बिल काढण्यासाठी शाखा अभियंता आयुब शेख यांनी २ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान मंगळवारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बार्शी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेतली. ही आढावा बैठक संपते तोपर्यंत पंचायत समिती कार्यालय आवारात लाच घेताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शाखा अभियंता शेख यांना पकडले अशी माहिती समोर आली आहे.

    ३१ ऑक्टोबर रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना २५ हजाराचे लाच घेताना अँटीकरप्शन विभागाने रंगेहाथ पकडले होते . या प्रकरणानंतर सीईओ दिलीप स्वामी यांनी प्रशासकीय कामकाजात पारदर्शकतापणा आणण्याचा प्रयत्न केला. ठाणेदार कर्मचाऱ्यांची उचल बांगडी करत तडकाफडकी 20 कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांनी केल्या. एकीकडे बदल्यांची रणधूमाळी उडत असताना बार्शी पंचायत समिती येथील शाखा अभियंता लाच लाच घेताना पकडल्याची वार्ता समजताचं जिल्हा परिषद पुन्हा हादरले आहे.