झेडपी सीईओ आव्हाळे यांचे पीए बदलले, प्रशासनाला नवा अधिकारी; तासाभरात बदलली फाईल

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नवीन ऑर्डर निघताच इकडे सायंकाळी सीईओ मनीषा आव्हाळे यांचे पीए बदलण्यात आले आहेत.

    सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नवीन ऑर्डर निघताच इकडे सायंकाळी सीईओ मनीषा आव्हाळे यांचे पीए बदलण्यात आले आहेत. झेडपीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन वेळा आपले पीए बदलले होते. सध्या मगे व मल्लिकार्जुन तळवार असे दोन स्वीय सहायक कार्यरत होते.

    दरम्यान सीईओ म्हणून मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतला. या काळात प्रशासनाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी नव्हता. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्याकडे हा कारभार होता. बुधवारी मंत्रालयातून प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारीपदी स्मिता पाटील यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्या गुरुवारी पदभार घेण्यास येणार आहेत असे समजल्यावर शेळकंदे यांनी जाता जाता सायंकाळी उशिरा सीईओ आव्हाळे यांचे पीए म्हणून दक्षिण सोलापूर पंचायत समितीतील लघु पाटबंधारे विभागाकडील लिपिक माने व नदाफ या दोघांची नियुक्ती केली आहे. प्रशासन विभागाला गेल्या काही दिवसापासून अधिकारी नव्हता, या काळात बऱ्याच नियुक्त्या अशा पद्धतीने वादग्रस्तपणे दिल्या गेलेल्या आहेत अशी कर्मचाऱ्यात चर्चा सुरु आहे. सीईओ आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतरही असा प्रकार घडल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    अद्याप भाड्याची गाडी…

    सीईओ आव्हाळे यांच्याकडे प्रशासक म्हणून कारभार आहे. वास्तविक सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर नसल्याने त्यांची गाडी रिकामीच आहे. पहिल्या दिवशी सीईओ आव्हाळे यांना अध्यक्षांची सफारी देण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा भाड्याची इनोव्हा गाडी त्यांच्या दिमतीला देण्यात आली आहे. ही गाडी भाड्याची आहे हे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे झेडपीच्या पैशांची उधळपट्टी कायम सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा कारभाराची सीईओ आव्हाळे यांना आता झाडाझडती घ्यावीच लागेल, असे कर्मचाऱ्यांमधून बोलले जात आहे.