शंभर बॅनरसाठी झेडपीला जावे लागणार लातूरला! आरोग्य विभागाचे 57 लाखाचे टेंडर संशयाच्या भोवऱ्यात

झेडपीच्या आरोग्य विभागाने विविध छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहीरात एजन्सीला  मंजूर केले आहे .त्यामुळे आता शंभर पोस्टरसाठी झेडपीचे कर्मचारी लातूरला जाणार का? असा सवाल खुद्द सीईओ मनीषा आव्हाळे यांना पडला आहे.

    शेखर गोतसुर्वे, सोलापूर: झेडपीच्या आरोग्य विभागाने विविध छपाईचे टेंडर लातूरच्या ममता जाहीरात एजन्सीला  मंजूर केले आहे .त्यामुळे आता शंभर पोस्टरसाठी झेडपीचे कर्मचारी लातूरला जाणार का? असा सवाल खुद्द सीईओ मनीषा आव्हाळे यांना पडला आहे.
    झेडपीच्या आरोग्य विभागाने एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या विविध छपाई कामासाठी 57 लाखाची ई निवीदा जाहीर केली होती. यात आरोग्य आय.ई .सी.छपाई व प्रिंटींग पुरवठय़ाचे काम राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत विविध योजना निहाय व विभागनिहाय सन २०२३-२४ करीता पोस्टर्स, बॅनर्स, स्टिकर्स, पॉम्पेल्टस, हस्तपत्रिका, रजिस्टर, डिजीटल बॅनर्स, फलेक्स, होर्डिंग्ज, फॉर्म आदी प्रकारची छपाई व प्रिंटींग पुरवठादारकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे ई निवीदा जाहीर केली होती. यासाठी अंदाजित निविदा 56 लाख 62 हजाराची असल्याचे नमूद करण्यात आले .
    निविदेचे कामकाज एका कंत्राटी कर्मचाऱ्याने पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व तो कंत्राटी कर्मचारी यांनी लातूरच्या संस्थेला निविदा मंजूर केली. आरोग्य अधिकाऱ्यांनी लातूरच्या जाहीरात एजन्सीला दिलेल्या कंत्राट्याच्या फाईलवर सीईओ आव्हाळे यांनी सही केली. त्यानंतर या मंजूर ठेक्याबाबत तक्रार आली त्यामुळे सीईओ आव्हाळे यांना या प्रकरणात काहीतरी काळे-बेरे असल्याचा संशय वाटला त्यामुळे त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मुख्य लेखा वित्त विभागाचा अभिप्राय घेतल्यानंतर एकदा मंजूर झालेली निविदा पुन्हा रद्द करता येत नसल्याचे सांगण्यात आले. सीईओ आव्हाळे यांनी ही निविदा कायम केल्याचे सांगण्यात येत आहे. पण आता कर्मचाऱ्यांना 100 पोस्टर साठी लातूरला जायचे का ?  असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे ही निविदा मंजूर करताना काहीतरी गडबडी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने ज्या जाहीरात एजन्सीला ही निविदा मिळाली त्या एजन्सीकडे छपाई चे सर्व साहित्य आहे का याची तपासणी कोणी केली? सोलापुरात छपाईची यंत्रणा नाही का ? छोट्या छोट्या कामासाठी लातूरच्या जाहीरात एजन्सीला सोलापुरातील छपाईचा ठेका परवडतो का असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी विविध प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्यांना बाबत संशय व्यक्त केला जात आहे.
    आरोग्य अधिकाऱ्यांची कारकीर्द वादळी
    आषाढी वारी दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नवले यांनी महा आरोग्य अभियानासाठी चांगले काम केले. पण आता कार्तिकी वारीदरम्यान त्यांचा कारभार वादळी ठरत असल्याचे दिसून येत आहे यापूर्वी महापालिकेत असताना कोरोना काळात त्यांनी खरेदी केलेल्या साहित्यावरून ही बरेच वादन उठले होते तत्कालीन आयुक्त तावरे यांनी त्यांच्या बदलीची शिफारस केली होती आता हीच वेळ सोलापूर झेडपीतही येणार का असे या प्रकरणावरून वाटत असल्याचे दिसून येत आहे.