झेडपीच्या आरोग्य विभागाने आचारसंहितेत राबविली भरती प्रक्रिया ; पहिल्या भरतीत वादाने रद्द झालेले पद केले गायब!

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बेनामी कारभाराचे अनेक नमुने आता बाहेर येत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आरोग्य विभागाने चक्क पदभरती प्रक्रिया राबवली आहे.

  शेखर गोतसुर्वे, सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बेनामी कारभाराचे अनेक नमुने आता बाहेर येत आहेत. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना आरोग्य विभागाने चक्क पदभरती प्रक्रिया राबवली आहे.

  जिल्ह्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती तसेच पोटनिवडणूकीसाठी मतदान 5 नोंव्हेबर रोजी तर मतमोजणी 6 नोव्हेंबर रोजी झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख तथा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या प्रभावक्षेत्रात येणाऱ्या व इतर गावांच्या योजना व कामे तात्पुरती पुढे ढकलले होती. असे असताना आरोग्य विभागाने मात्र राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील रिक्त जागांची पदभरती जाहिरात केली व त्या पदभरतीच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या पदांबाबत अर्जांची स्वीकृती केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असताना अशी पद भरती करता येते का असा सवाल उपस्थित केल्यावर आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे आचारसंहितेचा नियम लागू होत नसल्याचा दावा केला आहे पण हा नियम रुग्णांच्या अत्यावश्यक उपचार सेवेसाठी लागू होत असल्याचे आता सांगण्यात येत आहे. अशा काळात अत्यंत आवश्यक असेल तरच निवडणूक अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पद भरती करता येते असे सांगितले जात आहे असे असताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रभारी कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विलास सरवदे यांनी ही पदभरती जाहीर केली. त्यानंतर आता उपस्थित झालेल्या या सवाल आणि गोंधळ निर्माण झाला असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांचे आरोग्य विभागावर नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

  पद केले गायब…
  यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आली होती. त्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु एका पदासाठी घेण्यात येणाऱ्या मुलाखतीच्या दिवशीच एमपीएससीची परीक्षा आल्याने या पदाच्या भरतीला विरोध झाला होता. त्यामुळे हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. आता नवीन भरतीत हे पद येणे अपेक्षित असताना नवीन भरतीत ‘त्या” पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याबाबत विचारण्यात आले असता डॉ. नवले यांनी याबाबत मला माहिती नाही, माहिती घेतो असे सांगितले पण महिनाभरात काहीच झाले नसल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांचे कामकाजाकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

  जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार करणार
  निवडणूक आचारसंहितेत भरती जाहीर करता येते का याबाबत स्पष्टीकरण घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर सचिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगीने हे कामकाज झाले का? याबाबतही खुलासा घेण्यात येणार असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.